मोठ्या विजयानंतर चिवटेंकडुन नव्या इनिंगची सुरुवात ; जल्लोषाचा डिजिटल वेधतोय लक्ष
नुकत्याच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पार पडल्या.यामध्ये कुठे अटीतटीच्या तर कुठे एकतर्फा विजय झालेला दिसून आला. त्यामध्ये सर्वात अधिक मतदान घेऊन भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या पत्नी अश्विनी चिवटे यांनी बाजी मारलेली दिसून आली. विशेष म्हणजे त्या अल्प संख्यांक समुदायातून असल्या तरी मराठा बहुल भागात खुल्या प्रवर्गातून उभ्या असताना एकतर्फी विजय मिळवत नियोजनबद्ध, प्रामाणिक काम केल्यानंतर जाती-पातीच राजकारण चालू शकत नाही असं दाखवून दिलं आहे. तर या विजयानंतर चिवटे समर्थकानी भावी आमदार म्हणुन फलक लावत 2029 च्या तयारीला लागल्याचं दिसत आहे.
सामान्यतः एखाद्या मतदार संघात काम करत असताना कमीत कमी एखादे तरी स्वतःचे गाव असावे. त्या ठिकाणी जातीपातीचे व धर्माचे लोक असले तर अधिकच उत्तम. अशा परिस्थितीत निवडणुका लढवणे व जिंकणे सोपे जाते. विशेष म्हणजे ज्या पक्षावर आपण निवडणूक लढवत आहोत कमीत कमी त्या पक्षाचं तरी लोकांमध्ये आकर्षण असले म्हणजे त्याचा पाठपुरावा जास्त करण्याची गरज पडत नाही. पण या सर्व गोष्टींना अपवाद म्हणून गणेश चिवटे समोर आले आहेत.

राजकारणाची सुरुवात भाजपमधून करत असताना तालुका अध्यक्ष म्हणून बऱ्याच दिवस भाजपाची धुरा सांभाळून ठेवलेले. गणेश चिवटे यांनी तालुक्यात भाजपा वाढवण्याचे काम केले. सर्वच जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी विविध कार्यक्रम व सामाजिक कामे राबवली. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला कामाची हमी दिली व त्यातून त्यांनी जनसंपर्क वाढवण्यासाठी सुरुवात केली. सुरुवातीला नगर परिषदेतून नगरसेवक म्हणून कामाची संधी मिळाल्यानंतर गणेश चिवटे यांनी आपला कामाचा आलेख सुरू केला.
मध्यंतरीच्या काळात चिवटे यांना जिल्हा परिषदेत डीपीडीसी सदस्य म्हणून घेतले. तेव्हापासून त्यांनी ग्रामीण भागात विवाह सोहळे, सामाजिक कामे व विकासाची कामे राबवली. मोठ्या प्रमाणावर निधी आणला व ग्रामीण भागात आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली. नगरपरिषदेतुन थेट जिल्हा परिषदेत जाण्याचं त्यांचं स्वप्न मागील तीन ते चार वर्षात त्यांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. परंतु अचानक आरक्षण पडल्यामुळे त्यांना महिला उमेदवार म्हणून पत्नीला उभे करावे लागले. पत्नी जरी राजकारणात नवख्या असल्या तरी गणेश चिवटे या नावाचा त्यांना मोठा आधार मिळाला.

मराठा बहुल भागात उभे असताना अल्पसंख्यांक समाजातील गणेश चिवटे यांनी मतदारांचा विश्वास संपादित केला व मोठ्या प्रमाणावर विजय मिळवत जातीपातीचे राजकारण चालत नसल्याचे दाखवून दिलं. विशेष म्हणजे या भागात गणेश चिवटे यांचं स्वतःचं एकही गाव नाही किंवा पावणे रावळे तर दूरचीच गोष्ट, अशा परिस्थितीत त्या ठिकाणी निवडणूक लढवीत एकतर्फी विजय संपादन करीत गणेश चिवटे यांनी येणाऱ्या काळात मोठे आव्हान उभं केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून मिशन 2029 च खुलं आव्हानच देऊन टाकले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात चिवटे हे विधानसभेची तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेचे त्यांचं स्वप्न पूर्ण झालं तसंच स्वप्न विधानसभेचे पूर्ण करण्यासाठी त्यांची तयारी सुरु झाल्याचे दिसत आहे.

