हिवरे शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री.जालिंदर हराळे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव पुरस्काराने सन्मान
दिलीप दंगाणे – करमाळा समाचार
रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या मंगलदिनी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई या संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय गुरु गौरव शिक्षक सन्मान सोहळा थाटात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील पुरस्कारासाठी निवडलेल्या १५१ मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात ऑनलाईन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ. श्री. विजयकुमार शहा या ऑनलाईन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या बीजभाषणात त्यांनी पुरस्कार मानकरी गुणवंत शिक्षकांनी भारतीय शिक्षण व्यवस्था संपूर्ण विश्वात प्रथम क्रमांकावर आणण्याचे आव्हान स्वीकारावे; असे आवाहन केले. सर्व पुरस्कार प्राप्त ग्रेट गुरूंचे अभिनंदन करून उत्तम शिक्षकांना समाज कायम वंदन करतो, असे गौरवोदगार काढले.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. सुशिल कुमार सिंग, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सौ. हेमाली जोशी, अमेरिकेतील सुप्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ती स्मायली घोषाल, दुबईस्थित शिक्षण तज्ज्ञ श्रीमती सुविद्या सुकुमार, मलेशिया येथील शिक्षिका चिंतामली, मणिपूर येथील शिक्षण संशोधक सौ. रोशनी वायकोम या समारंभाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सौ. मनिषा कदम यांनी केले. गुणिजन परिवाराचे पदाधिकारी श्री. प्रकाश सावंत, श्री. लक्ष्मणराव दाते, श्री. चंद्रहास गावंड, श्री. नारायण वाणी इत्यादी मान्यवर यावेळी ऑनलाईन उपस्थित होते. या ऑनलाईन समारंभाचे अध्यक्षस्थान गुणिजन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट श्री. कृष्णाजी जगदाळे यांनी भूषवले. यावेळी झालेल्या विविध गीतांच्या सादरीकरणात मानकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट श्री. कृष्णाजी जगदाळे यांनी उपस्थितांना ऑनलाईन ग्लोबल गुणिजन शपथ प्रदान केली आणि गुणिजन संसदेत पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. हजारो टाळ्यांच्या साक्षीने हा ठराव ऑनलाईन मंजूर झाल्याचे त्यांनी जाहीर केले. १९९९ मध्ये स्थापना झालेल्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेचा हा २१ व्या वर्षातील गुरुगौरव सोहळा होता. पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते! या ब्रीदवाक्यावर संस्थेची लोकल ते ग्लोबल वाटचाल झाली असल्याचे प्रतिपादन ऍड. कृष्णाजी जगदाळे यांनी केले. राज्यस्तरीय सोहळ्यानंतर झालेल्या राष्ट्रस्तरीय सोहळ्यात भारतभरातून १५१ शिक्षकांना नॅशनल लेव्हल टिचर्स गुरु सन्मान अवॉर्ड्स प्रदान करण्यात आले.