मामा समर्थकांचा भाजपा प्रवेश ; राजकीय पडझड की गनिमीकावा ?
करमाळा समाचार
तालुक्याच्या ठरलेल्या परंपरेनुसार सत्ताधारी पक्षाकडे जाण्याचा ओढा अद्यापही सुरूच आहे मागील निवडणुकांमध्ये याची प्रचिती आली होती तर आता यंदाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी भाजपा तसेच शिवसेना शिंदे गट यांच्यात प्रवेश सुरू झाले आहेत काही दिवसांपूर्वी माजी आमदार जयवंतराव जगताप तर मंगळवार दि आठ रोजी विधानसभेचे अपक्ष उमेदवार रामदास झोळ, संजयमामा शिंदे गटाचे खंदे समर्थक कन्हैयालाल देवी व सुर्यकांत पाटील यांनी भाजपात प्रवेश केला मुळातच ते माजी आमदार शिंदे यांच्या माध्यमातून युती मध्येच असताना हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गटाची पडझड की गनिमी कावा हा प्रश्न निर्माण झाला आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असतानाही संजयमामा शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांचा या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पण ते कायम अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून महायुती सरकारमध्ये असल्याचे जाहीरपणे बोलत आलेले आहेत. त्यामुळे ते पराभूत असले तरी सरकारमध्येच आहेत. पण त्यांच्याच गटातील खंदे समर्थक असलेले शहराची राजकीय धुरा सांभाळलेली असे कन्हैयालाल देवी व पश्चिम भागाचे नेते सूर्यकांत पाटील यांनी नुकतेच भाजपात प्रवेश केला. यावरुन चर्चाना उधान आले आहे. गटात फुट पडलीय की काय असे चित्र निर्माण झाले आहे.
चर्चा कशाही असल्या तरी अशी भूमिका घेण्यामागचं नेमकं कारण काय असू शकत यावर दृष्टीक्षेप टाकल्यास दुसऱ्याच बाबीअसु शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुळातच सूर्यकांत पाटील हे जरी वैयक्तिक राजकीय भूमिका घेऊ शकतात पण कन्हैयालाल देवी मात्र शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांची ही भूमिका येणाऱ्या काळात शिंदेंसाठीच पूरक असू शकते. त्यामुळे विधानसभा व आदिनाथ मध्ये बागल यांच्याकडुन समोरच्या दाराने मदत न मिळाल्याने आपले जवळचे लोक सत्तेसाठी पक्षाच्या माध्यमातून पुढे पाठवले गेले असल्याचा अंदाज आहे. तर बागल गटाचा तालुक्यासह नगरपरिषद निवडणूकीत वरचष्मा आहे. त्यामुळे बागल आधीच बीजेपीत असताना त्यांच्यासोबत जाऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांच्यासोबत जात सत्ता मिळवण्याचा देवी यांचा प्रयत्न असु शकतो. अशा परिस्थितीत देवी यांनी बागलांसोबत सत्तेत आले तरी त्याचा लाभ बागलांना होईल का शिंदेंना हे अत्ताच सांगणे कठीण आहे. पण शिंदे गटाकडुन सदरची खेळी गणीमी काव्याप्रमाणे खेळली जात असल्याच्या चर्चा आहेत.

पडझड असल्यास शिंदे गटाला मोठा धक्का …
सदरच्या प्रवेशामागे दुसऱ्या फळीतील नेत्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेणे ही शिंदे गटासाठी धोकादायक ठरू शकते. पक्षाच्या माध्यमातून यापुर्वी शिंदे यांचे निकटवर्तीय सावंत गटाने त्यांची साथ सोडलेलीच होती आता भाजपा सोबत गेलेले कन्हैयालाल देवी यांनी भाजपा सोबत जाऊन रश्मी बागलांसोबत गेल्यास हा शिंदे गटाला धक्का असु शकतो. तालुक्यात इतर गटातीलही दुसऱ्या गटाचे नेते मंडळीही पक्ष प्रवेश करण्याच्या विचारात आहेत अजुन काही चाचपणी करीत आहेत त्यांनी पक्ष बदलाचे निर्णय घेणे हे पक्षाच्या किंवा गटाच्या प्रमुखाचे अपयश मानले जाऊ शकते त्यामुळे हा निर्णय नेत्याला विश्वासात न घेता घेतला असेल तर हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो.
