इथेनॉल निर्मिती – राज्यातील १३६ कारखान्यांना नवी उर्जा ; …तर भाव देणे शक्य – मोहिते पाटील
करमाळा समाचार
केंद्र शासनाने चालू ऊस गळीत हंगामासाठी साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला संमती दिली आहे. साखर कारखान्यांना उसाचा रस, सिरप, बी हेवी, मॉलिसिस पासून इथेनॉल निर्मिती करणे शक्य होणार असल्याने राज्यातील १३६ साखर कारखान्यांना आर्थिक उर्जा तर शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळू शकतो. मागील हंगामात ऊस उत्पादन घटले होते. यंदा ऊस क्षेत्र अधिक असल्याने केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध नुकतेच मागे घेतले.
परिणामी सोलापूर विभागातील कारखान्यांना १ लाख २७ हजार ४१८ किलो लिटर इथेनॉल निर्मितीची मान्यता असेल. सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील ५० पैकी १३ साखर कारखाने इथेनॉल बनवतात. काही कारखानदारांचे एकापेक्षा अधिक युनिट असल्याने ते एकाच कारखान्यात निर्मिती करतात.
मागील वर्षी डिसेंबर मध्ये इथेनॉल निर्मितीवर केंद्र सरकारने निर्बंध आणले होते. यामुळे राज्यातील कारखान्यांना दोन ते अडीच हजार कोटींचा मोठा फटका बसला होता. यंदाच्या गाळप हंगामासाठी निर्बंध हटवल्याने साखर कारखान्यांचे आर्थिक गणित जुळण्यास मदत मिळेल. मध्यंतरी साखर दरामुळे काही कारखाने अडचणीत आले होते. परिणामी जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढू लागले. ऊस उत्पन्न कमी झाल्याने कारखान्यांवर साखर निर्मितीचा भार वाढू लागला होता. त्याशिवाय साखर निर्यातीवर बंधने घातल्याने गोडाउनमध्ये साखर पडून होती.
... तर एफआरपीप्रमाणे मिळेल उसाला दर
इथेनॉल उत्पादक असोसिएशनच्या मागणीवरून शासनाने सर्व बंधने काढुन २०२४-२५ गळीत हंगामात इथेनॉल उत्पादनास मान्यता मिळाली आहे. यामुळे साखर उद्योगाला नवसंजीवनी मिळेल. कारखान्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. १५ डिसेंबर २०२३ च्या परिपत्रकान्वये अल्कोहोल व इएनएच्या उत्पादनावर अद्याप बंदी आहे. उसाचा रस / सिरप व बी हेवी मळीपासून आरएस (अल्कोहल) व इएनए उत्पादनास मंजुरी मिळायला हवी. यामुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर देणे शक्य होईल.
– विजयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष, इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया.
सप्टेंबर, ऑक्टोबर… १०१ कोटी लिटरची मागणी
उसाचा रस, सिरप, बी हेवी, मॉलिसीसपासून इथेनॉल निर्मितीला मागील हंगामात बंदी होती. ती बंदी उठवल्याने आता इथेनॉल निर्मिती सुरु होईल. ऑइल कंपन्यांनी मागणीसाठी टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरसाठी १०९ कोटी लिटरची मागणी आहे. ती मागणी पुर्ण झाल्यावर पुढील मागणी केली जाईल.
– अविनाश देशमुख, सह संचालक, उपउत्पादन, साखर आयुक्तालय, पुणे.