पवारांच्या एंट्रीपुर्वीच करमाळ्याचे राजकारण तापले ; पवाराविरोधात रचली जातेय गुपीत खेळी
करमाळा समाचार
तालुक्याच्या राजकारणात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पवार कुटुंबीयांची एन्ट्री होऊन करमाळा तालुक्यासह परिसरातील तालुक्यांमध्ये दबदबा वाढणार हे निश्चित वाटत असल्यानेच काहीजणांना ते पचनी पडत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच मागील तीन वर्षापासून बंद असलेला कारखाना पुन्हा एकदा सुरू होईल अशी आशाही वाटत असताना पवारांना विरोध करून कारखान्यालाच सुरू होण्यापासून अडवणूक केली जात आहे का ? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

कारखाना अडचणीत असताना तालुक्यातील कोणच समोर येऊन कारखाना आम्ही बाहेर काढू, आमच्याकडे द्या असं वक्तव्य करताना दिसत नव्हते. तेव्हा निवडणुकांच्या काळात ही कारखाना आपल्याकडे यावा यासाठी अधिक जोर कोण लावताना दिसले नाही. कारण त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक झालेली असल्याने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याची ताकद कोणातच नव्हती हे स्पष्ट झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या रश्मी बागल यांनी कारखान्याची निवडणूक जिंकत कारखाना आपल्या ताब्यात घेतला मात्र पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी त्यांना अपयश आले. तर यामध्येही कामगारांचे हित न पाहता कारखाना अडचणीत कसा आणता येईल यासाठी आतुन व बाहेरून काहीजण प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.

दरम्यानच्या काळात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीतही कारखान्याच्या अपयशामुळे बागल गटाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. तर शिंदे गटाचे वर्चस्व करमाळा तालुक्यात नव्याने उभ्या झाले आहे. शिंदे यांचा स्वतःचा एक खाजगी कारखाना करमाळा परिसरात आहे. तर मागील काही दिवसापासून कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा संचालक मंडळाचा विचार असल्याबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर त्यात पवारांना रस असल्याचे दिसुन आले किंवा पवारच पुन्हा कारखाना उभा करु शकतील असे चित्र असताना त्याला मात्र विरोध केला जात आहे. नेमके अशा लोकांना काय खुपतेय हे लक्षात येण्यापलिकडे आहे. बंद पडलेला कारखाना सुरु होत असेल तर अडचण येण्याचे काहीच कारण नसावे पण तसे होताना दिसत नाही.
पुन्हा लोकसभेसारखाच विरोध …
स्थानीक नेत्यांनी लोकसभेलाही अशीच चाल खेळली होती. लोकसभेला कोणता उमेदवार उभा रहाणार यावरुन वाद असताना जेष्ठ नेते शरद पवारांचे नाव जाहीर करण्यात आले. पण आपल्याच कार्यकर्त्याना सांगुन पवारांची बदनामी केली त्यामुळे पवारांनी लोकसभा माढ्यातुन न लढण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. अदिनाथ कारखाना रोहित पवार चालवणार असे चित्र सुरुवातीला निर्माण केले पण आता स्थानीक गटातटाच्या नेत्यांना समोर करु खेळी खेळली जातेय का ? असा प्रश्न तपार होतोय.
अदिनाथ मध्ये पवारांच्या एंट्रीने गणिते बदलणार…
पवार कुटूंबातील युवा नेतृत्व रोहित पवार हे लक्ष घालणार असल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले. तेव्हा पासुन कामगार आणी सभासद संचालकात उत्साहाचे वातावरण होते. पण पवारांनी तालुक्यात अदिनाथच्या माध्यमातून प्रवेश केल्यानंतर तालुक्यात राजकीय दबदबा तयार होईल. आणी एकदा पवार तालुक्यात सक्रिय झाले तर मोठा गट त्यांच्या साठी काम करेल त्यामुळे स्थानीक गटाचे व विरोधक यांच्यावर परिणाम करणारे ठरणारे आहे. त्यामुळे पवारांच्या एंट्रीमुळे गणीत बदलणार हे निश्चित आहे.