सीना कोळगाव प्रकल्पातील अतिरिक्त पाणी करमाळा तालुक्यातील नेरले ,गौंडरे तलावात सोडावे
करमाळा समाचार
सीना-कोळेगाव प्रकल्पातून वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी करमाळा तालुक्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये सोडावे अशी मागणी करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी पुणे विभागाचे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना आ. शिंदे यांनी सांगितले की, सद्यस्थितीत सिना कोळेगाव प्रकल्प हा अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने भरत आलेले आहे. मात्र करमाळा तालुक्यात मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे बऱ्याच सिंचन प्रकल्पामध्ये अद्याप पाणी साठा झालेला नाही. एकीकडे सीना नदीतील सर्व प्रकल्प भरून पाणी सोडून देण्याची वेळ येत आहे. तर दुसरीकडे करमाळा तालुक्यातील बऱ्याच प्रकल्पामध्ये अजून पाणी साठा झालेला नाही. या सर्वांचा विचार करता सीना-कोळेगाव धरणातील अतिरिक्त पाणी करमाळा बाजूच्या उपसा सिंचन योजनेतून नेरले ल.पा तलावात सोडण्याबाबत शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
दुसरीकडे सीना-कोळेगाव धरणाच्या खाली, सोलापूर जिल्ह्याहद्दीपर्यंत 20 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून पावसाळा हंगाम संपत आल्याने या बंधाऱ्यावर बर्गे टाकायचे नियोजन चालू आहे. अशा परिस्थितीत सीना-कोळेगाव मध्ये येणारे अतिरिक्त पाणी नदीत सोडल्यास बंधाऱ्याचे बर्गे टाकण्याच्या कामात अडथळा येईल आणि बंधाऱ्याच्या बांधकामासही धोका होऊ शकतो. या कारणास्तव धरणातून सोडले जाणारे पाणी हे इतरत्र वळविण्यात यावे. याकामी उपसा सिंचन योजना कार्यान्वित केल्यास मदत होईल.वाहून जाणारे अतिरिक्त पाणी लाभक्षेत्राच्या पुनर्भरणासाठी उपयुक्त असून यामुळे पुढील हंगामातील पाण्याची मागणी कमी होऊन सिना कोळेगाव प्रकल्पावरील पाणी वापराचा ताण कमी होतो. या सर्व बाबींचा सारासार विचार करता ,करमाळा बाजू उपसा सिंचन योजना चालू करून नेरले तलावात पाणी सोडण्यात यावे यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
या निवेदनाच्या प्रती अधिक्षक अभियंता उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ व कार्यकारी अभियंता सीना कोळेगाव प्रकल्प विभाग यांना देखील दिले असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली.
