रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकरी आर्थिक संकटात
करमाळा समाचार – संजय साखरे

सद्यस्थितीत शेतकरी आणि शेती क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी असताना रासायनिक खतांच्या दरवाढीने एक नवीन आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे केले आहे. रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांवर नवीन आर्थिक संकट कोसळले आहे. गोणीमागे सरासरी 200 ते 250 रुपयाची वाढ झाल्याने या हंगामातील आर्थिक नियोजन कोलमडल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरू राहिल्याने तालुक्यातील 80% पेक्षा अधिक रब्बी पेरणी पूर्ण झाली आहे. ज्वारी, कांदा, हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांची उगवण चांगली झाली असली तरी हवामानातील अनिश्चितता व किडींचा प्रादुर्भाव यामुळे पिकांना फटका बसत आहे. त्यावर खतांच्या वाढीव दराचा अतिरिक्त भार पडला आहे. उत्पादन खर्च झपाट्याने वाढत असताना शेतमालाचे दर मात्र स्थिर किंवा घसरते आहेत.
हमीभाव जाहीर असला तरी बाजारात प्रत्यक्ष तो दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बाजारातील उपलब्धता, वाहतूक खर्च व वितरणातील ताण यामुळे खतांचे दर बदलत आहेत. शेती खर्च व उत्पादन मूल्यांचा समतोल साधण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे.


