करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

आरतीवरुन मंदीर परिसरात पुजाऱ्यांमध्ये मारामारी ; आरती चेमटली, एकाचे डोके फुटले

करमाळा समाचार – 

करमाळा येथील श्रीदेवीचामाळ मंदिर परिसरात आरती घेण्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन झालेल्या मारहाणीत एकाच्या डोक्यात आरती मारून जखमी केले आहे. याप्रकरणी श्री जगदंबा कमला भवानी ट्रस्ट चे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ डिसेंबर रोजी शनिवारी रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान सदरचा वाद झालेला दिसून आला.

याप्रकरणी ओंकार पुजारी, योगेश कवादे, रोहित पुजारी, अभिमान सोरटे, सागर सोरटे, रोहित सोरटे, सचिन सोरटे, प्रमोद गायकवाड सर्व रा. देवीचा माळ तालुका करमाळा यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

politics

याबाबत अधिक माहिती अशी की, कमलादेवी या मंदिरातील श्री जगदंबा मूर्ती समोरील रोख रकमेचा मक्ता 3 ऑक्टोंबर पासून बापू पुजारी व इतरांकडे आहे. दिनांक ७ डिसेंबर रोजी शनिवारी रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान चंपाष्ठी निमित्त खंडोबा पालखी सोहळा हा परंपरेनुसार श्री देवीचा माळ मंदिराच्या पूर्व वेस येथे येत असतो. त्यावेळी श्री जगदंबा कमलादेवी देवस्थानचे ट्रस्टचे वतीने श्री खंडोबा रायाला पूर्ण पोशाखाचा आहेर तसेच खंडोबा मंदिर पुजारी, वाघे मुरळी, पालखी, खांदेकरी, संबळ, वाजंत्री, मानकरी यांचा आहेर केला जातो.

श्री कमलादेवी मंदिर पुजारी यांचे कडून खंडोबा मंदिर पुजारी यांचा गळाभेटीचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाची रूपरेषा मक्ता घेणारे पुजारी यांच्याकडून खंडोबा मंदिर पुजारी यांना आरती घेऊन एकमेकाला औक्षण करून गळा भेट घेण्याचा कार्यक्रम परंपरेनुसार चालत आलेला आहे. दरम्यान मक्ता न घेणारे पुजारी यांचा काही एक संबंध नसताना त्यांच्यात आपापसात वादाला सुरुवात झाली. यातून मंदिर परिसरातील देवीची आरती पाच फूट उंचीवरून नेऊन आढळण्यात आली. त्यामुळे पुरातन आरतीचे नुकसान होऊन ती चेमटली आहे.

याशिवाय दोन्ही गटात मारामारी झाल्याने सदर मारहाणीत योगेश कवादे यांच्या डोक्यात रोहित सोरटे यांनी आरती मारल्याने ते जखमी झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटातील सहभागी असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर घटनेचा पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE