सध्याच्या राजकीय आरोपांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार विरोधकांवर कडाडले ; अनेक मुद्द्यांच्या आधारावर टिकास्त्र
आ. शिंदे हे त्यांचे कारखाने व सभासदांचे प्रश्न सोडवायला सक्षम आहेत, कुवत नसणारांनी उगीचच लुडबुड करू नये
माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा समाचार

आ .संजयमामा शिंदे हे त्यांचे कारखाने चालवायला सक्षम आहेत . आपण आपल्या ताब्यातील कारखान्यांची काय दुरावस्था केली हे अगोदर बागल व पाटील या तालुक्यातील जनतेने नाकारलेल्या नेत्यांनी पहावे व नंतरच माढा तालुक्यातील प्रश्नांकडे पहावे असे मत माजी आ. जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले .
सध्या करमाळा तालुक्यामधे आ .संजयमामा शिंदे यांनी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर व विकास कामांवर भर देवून तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी व आरोग्याची कामे मार्गी लावत असल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे . परंतु विरोधकांना मात्र आपल्या राजकीय भवितव्याची चिंता लागून त्यांच्या पाया खालची वाळू घसरली आहे व ते आ . शिंदे यांच्या कारखान्यांच्या कर्जाबाबत बेछूट आरोप करीत आहेत . माजी आ .पाटील हे ज्या तथाकथित सहकारातील नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत त्यांच्या कारखान्याच्या ऊस उत्पादकांची देणी , बँका व पतसंस्था तसेच कुक्कुटपालन संघातील सभासंदांची देणी याबाबतही माजी आ. पाटील यांनी त्यांना जाब विचारावा. त्यांचा लिलावात निघालेला कारखाना देखिल याच शिंदेंनी विकत घेवून सक्षमपणे चालवून तेथिल शेतकर्यांना न्याय दिला आहे.तालुक्यातील शेतकरी व त्यांच्या अडी -अडचणी आ. शिंदे सोडवतील तुम्ही उगीचच पुतणा बाईचा पान्हा आणून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये .
करमाळा तालुक्यातील जनतेने तुम्ही कारखान्यांची, ऊस उत्पादकांची, कामगारांची, सभासदांची केलेली दुर्दशा अनुभवल्यामुळेच तुम्हाला विधानसभेला नाकारले आहे . आ शिंदे यांनी नियमीतपणे कुकडीची आवर्तने सोडली आहेत . दहिगावची थकलेली लाखो रुपये वीजबीले गेल्या दीड वर्षात तीन वेळा भरून दहिगावचे पाणी सोडले आहे . दहिगांव उपसा सिंचन योजनेचे श्रेय लाटणाऱ्या विरोधकांनी वीज बीलाच्या नावाखाली ऊस उत्पादकांकडून एकरी १२०० रु . व ज्वारी उत्पादकां कडून एकरी ७०० असे गावागावातून लाखो रुपये गोळा केले त्याचे काय झाले? याचा खुलासा द्यावा असे आव्हान जगताप यांनी दिले .
आ शिंदे यांनी कुकडी चे पाईप लाईन व्दारे पाणी व दहिगाव साठी सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव तयार केले आहेत . आरोग्य विभागासाठी कोट्यावधीचा निधी आणून कॉटेजमधे सिझेरीयन सह कोवीड काळात सर्वोतपरी मदत केली आहे . जेऊर येथे रुग्णालय कार्यान्वित केले आहे . रस्ता व वीजेची प्रश्ने मार्गी लावलेले आहेत . आठवड्यातून २ ते ३ दिवस मंत्रालयात हजर राहून शासनदरबारी तालुक्यातील विविध विकास कामांचा पाठपुरावा आ शिंदे करीत आहेत . शासन दरबारी वजन असल्यामुळेच आ . शिंदे यांनी इंदापूर तालुक्याला ५ टीएमसी पाणी देण्याचा शासन निर्णय रद्द करून घेतला . माढा तालुक्यातून ६ वेळा आमदारकी, जिल्हा परीषद – पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकणे, बाजार समिती ,दूध संघा सारखी निवडणुक व २८००० हजार सभासद असलेला साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणे हे तालुक्यातील जनतेने विकास कामांची केलेली परतफेडच नाही का? या बाबींचा विचार करून ज्यांची ग्रामपंचायतीला निवडून येण्याची कुवत नाही त्यांनी सवंग प्रसिद्धीसाठी जिल्ह्याने स्विकारलेल्या नेतृत्वावर भाष्य करण्याआधी आपली कुवत तपासावी असे मत देखील माजी आ जगताप यांनी व्यक्त केले . आ संजयमामा यांचेबाबत जिल्ह्याच्या स्वयंघोषीत युवा नेत्याच्या गाडीचे चालक म्हणून हेटाळणी केली जाते परंतू महाभारतामध्ये देखिल रथात बसलेल्या अर्जूनापेक्षा रथाचे सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला सर्वत्र पूजले जाते याचाही त्यांनी विचार करावा .
समाजाचा व शेतकर्यांचा पुळका आणणार्यांनी माळशिरस तालुक्यातील शेतकरी व धनगर समाजासाठी देखिल आवाज ऊठवावा.आ .शिंदे बंधूनी माढा तालुक्यात विधायक काम केल्यामुळेच ४ ते ५साखर कारखाने, सुतगिरणी, बँका, दूध डेअरी , विधानसभा सदस्यत्त्व या माध्यमातून तालुक्यातील जनतेचे प्रपंच उभे केले आहेत . प्रतिवर्षी सामुदायीक विवाह सोहळे, मोफत नेत्र शिबीर, आरोग्य शिबीर, काशी यात्रा सारखे उपक्रम राबवित सामाजीक बांधली जपली आहे .माजी आ. नारायण पाटील यांनी बंडगर यांचेबद्दल केलेल्या विधानाबाबत बोलताना जगताप म्हणाले कि, पाटील हे आत्ता बंडगर आमचे नसल्याचे जाहीर करत आहेत .
परंतु बिनशर्त पाठींबा जाहीर करताना ऐनवेळी बंडगर यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला नसता व बंडगर यांनी आमच्या गटातून निवडुन येवून बंडखोरी केली नसती तर कदाचित आज तालुक्याची राजकीय परिस्थिती वेगळी दिसली असती . मार्केट कमिटीच्या निवडणुकीत झरे, कंदर व हिसरे गणाच्या जागा ऐनवेळी दबाव टाकुन घेतल्या व बिनशर्त पाठींबा देण्याचा फक्त जनतेसमोर फार्सच केला.विरोधकांनी केलेली षडयंत्रे व कुरघोड्या त्यांच्याच अंगाशी आलेल्या आहेत . विरोधकांनी तालुक्यातील संस्था मोडून खाल्ल्या, संस्था विश्वास घाताने लाटल्या पण एकही संस्था उभी केली नाही . उजनी, कुकडी सह शिक्षण संस्था , बँक ,बाजार समितीसह अन्य सह संस्था स्व.नामदेवराव जगताप यांनी उभा केल्या, आम्ही त्या सक्षमपणे चालविल्या व जनतेला न्याय दिला .
जिल्हा परीषद व विधानसभेच्या माध्यमातून जगताप व शिंदे कुटुंबियांनी मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी व सुविधेसाठी आपली कारकिर्द पणाला लावली . सीना -कोळगाव धरण भूमीपूजन व लोकार्पण तसेच दहिगांवची मूळ ८५०० हे . ची मान्यता माझ्याच कारकिर्दितील असल्याचे जगताप यांनी सांगीतले .बाजार समिती समर्थपणे चालवून शेतकरी हिताचेच निर्णय घेतले . शेतकरी व व्यापार्यांमधे समन्वय ठेवून कामकाज केले त्यामुळेच आज करमाळा बाजार पेठेचा विश्वसनीय बाजारपेठ म्हणून सर्वत्र लौकिक आहे, जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्राधान्याने करोडो रुपयांचे पिक कर्ज ,पाईपलाईन साठी कर्ज वितरण करून शेतकऱ्यांचे प्रपंच स्वाभिमानाने उभा करणेकामी अर्थसाहाय्य केले, आदिनाथ कारखान्याच्या माझ्या चेअरमन पदाच्या कारकिर्दीत जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर दिल्याची नोंद आहे.
तसेच माझ्या आमदारकीच्या काळात करमाळा नगरपरीषदेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक सुरळीत व अखंडीत पणे सुरु असलेली शहरवासियां साठीची पाणी पुरवठा योजना तसेच रस्ते, वीज, आरोग्य व अन्य जनसुविधा याचा आपणास सार्थ अभिमान असल्याचे देखील जगताप यांनी सांगीतले.मा.आ. पाटील यांनी नुकतेच त्यांच्या तालुक्यातील यूती व आघाडयांबाबत भाष्य केले यावरून सत्तेसाठीची त्यांची राजकीय मानसिकता व वैचारिक पातळी लक्षात येते.परंतु अलीकडील काळात विरोधकांनी तालुक्यातील संस्थांचा सतेच्या माध्यमातून केलेला सत्यानाश , सातत्याने षडयंत्र व कुरघोडयाचे राजकारण याचा उबग आला .व तालुक्यातील राजकारणाचे शुद्धीकरण करण्यासाठीच मी जाणीवपूर्वक विकासाची दृष्टी असलेले पारदर्शी नेत्तृत्व म्हणून संजयमामा शिंदे यांना आग्रहाने विधानसभेला उभे करून तालुका विकासाच्या मुळ वाटेवर आणणेसाठी विधीमंडळात पाठविणे कामी पाठींबा देणेचा निर्णय घेतला होता व सार्थकी लागत असल्याचे आज मनोमनी समाधान असल्याचे देखील माजी आमदार जगताप यांनी सांगीतले .
करमाळा,पुणे व मुंबई येथे लोकांच्या भावनेच्या उद्रेकाचा प्रसाद खाऊन आलेले दिग्वीजय बागल हे आ. संजयमामा ताकदीचे व फार मोठे नेते नाहीत असा उल्लेख करतात या बालीश तरुणाला याच संजयमामा व शिंदे बंधुंच्या पाठबळामुळे २००९साली कुर्डूवाडी भागातून तब्बल ५० हजार मते यांच्या मातोश्रींना देऊन आमदार केले होते या बाबींचा विसर पडला . परंतु विस्मरण व विश्वासघात यांच्या रक्तातच आहे. स्व. दिगंबर बागल यांच्या राजकिय जीवनाचा श्री गणेशा मीच त्यांना पंचायती समितीचा सभापती करून केला होता. परंतू यांच्या कडून प्रामाणिकपणा व निष्ठेची अपेक्षा करणे व्यर्थ व चुकीचे आहे असे मा.आ. जयवंतराव जगताप यांनी सांगितले .