मागील दोन वर्षापासुन रखडले घरकुलाचा निधी ; निधीसाठी नीळ यांचा पाठपुरावा
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील सन २०१८/१९ मधील २११ लाभार्थी यांचे घरकुले निधी अभावी अपूर्ण राहिली आहेत तर सन २०१९/२० मधील १८० रमाई घरकुल योजनेतील अशा एकूण ३९१ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सतीश नीळ पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री मा.ना. अजितदादा पवार यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील विविध गावातील गरजु गोरगरीब मागास प्रवर्गातील रमाई घरकुल योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या सन २०१८/१९ मधील २११ लाभार्थ्यांची घरकुल बांधकामे अपूर्ण राहिली आहेत त्यांना अद्यापही अनुदानाची रक्कम मिळाली नाही.तसेच सन २०१९/२० मध्ये १८० लोकांना रमाई योजनेतून घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यानंतर सबंधित पात्र लाभार्थी यांनी करमाळा पंचायत समिती कडे रीतसर करार करून गेल्या चार महिन्यापूर्वीच घरकुल बांधकाम सुरू केली होती. त्यावेळी पैं पाहुणे, उधार उसनवार करून व प्रसंगी व्याजाने पैसे घेऊन घरकुल बांधकाम साहित्य खरेदी केली होती.व बांधकाम करण्यास सुरुवात केली होती.

परंतु त्यानंतर महामारी कोविड १९ मुळे देशांत व राज्यभर मोठे संकट आले आहे. अशी भयानक परिस्थिती निर्माण झाल्यावर सदरील कामे पैशा अभावी बंद करण्यात आलेली आहेत. परंतु खरेदी केलेल्या साहित्याचे पैसे अद्यापही दिलेले नाहीत. त्यामुळे सदरील लोकांचा पैशासाठी वारंवार तगादा वाढत आहे.व मागास प्रवर्गातील घरकुल पात्र लाभार्थी यांना अत्यंत मानसिक त्रास होत आहे. तरी करमाळा तालुक्यातील रमाई घरकुल लाभार्थी यांचा पहिला हप्ता व मागील राहिलेले अनुदानाची रक्कम तात्काळ वाटप करण्यात यावी अशी मागणी श्री. नीळ पाटील यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, इतर मागास व बहुजन कल्याण राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे, आमदार संजय मामा शिंदे, शिवसेना नेत्या रश्मी दिदी बागल, जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर व गट विकास अधिकारी पंचायत समिती करमाळा यांना दिल्या आहेत.