सोन्याच्या पावली… हळदी कुंकवाच्या पावली… रुप्याच्या पावली… धनधन्याच्या पावलांनी गौराई आली
केत्तूर (अभय माने)
सोन्याच्या पावली… हळदी कुंकवाच्या पावली… रुप्याच्या पावली… धनधन्याच्या पावलांनी गौराई आली असे म्हणत गणरायाच्या आगमनानंतर मंगळवारी (ता.10) रोजी गौराई घरोघरी स्थानापन्न झाल्या.गौराईचे चैतन्यमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात स्वागत करून बुधवारी (ता.11) त्यांची विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी महिलांचा उत्साह,थाट काही औरच होता.सायंकाळी मात्र वरून राजाने रिमझिम हजेरी लावल्याने उत्साह काहीअंशी कमी झाला होता.

मंगळवारी सायंकाळी गौराईंना भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविल्यानंतर बुधवारी दुपारी सर्व परिवारांनी विधिवत पूजन करून पुरणपोळीच्या नैवेद्य गौरीला दाखवला व त्यांच्याकडे सर्वांच्या कुशल मंगलाची प्रार्थना केली.

मंगळवारी घराघरात आलेल्या गौरीच्या सजावटीसाठी आकर्षक पद्धतीने फुलांची सजावट,विद्युत रोषणाई,गौरीना काठापदराच्या साड्या, गळ्यात मोहनमाळ, मंगळसूत्र, कमरपट्टे, गजरे, हार, वेण्या, हातात पानाचा विडा आदिंनी गौराईच्या मूर्ती सजवण्यात आल्या होत्या. गौराई समोर आकर्षक खेळणी ठेवण्यात आली होती. गौरीपूजनानिमित्त घरासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.लक्ष्मी पाहण्यासाठी व हळदी कुंकवासाठी शेजारीपाजारी महिलांना तसेच मित्र परिवाराला आमंत्रण दिले जात होते.
माहेरवाशिण म्हणून आलेल्या या गौरीचे (लक्ष्मीचे) घरोघरी स्वागत करण्यात आले.महालक्ष्मीच्या रूपाने आलेल्या ह्या माहेरवाशीणीच्या स्वागताची तयारी महिला अनेक दिवसापासून करीत होत्या.बुधवारी दिवसभर शेजारीपाजारी तसेच मित्र परिवाराच्या लक्ष्मी पाहणे,दर्शन घेणे असा कार्यक्रम सुरू होता गौराईसमोर समाज प्रबोधन करणारे देखावेही करण्यात आले होते.काही ठिकाणी वृक्ष लागवड महत्त्वाची असल्याचा सामाजिक संदेशही देण्यात आलयाचे दिसून आले