करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मोहितेंच्या भुमीकेचे करमाळ्यात पडसाद ; शिंदेगट शिवसेनेच्या प्रमुख नेत्याला डावलुन पालकमंत्र्यांचा दौरा

करमाळा समाचार – विशाल घोलप

माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आज करमाळा दौरा आहे. यादरम्यान ते तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मात्र त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेतून माजी आमदार नारायण पाटील यांना वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागील लोकसभेत पाटील यांचे योगदान मोठे होते. शिवाय शिंदे गटाचे ते मोठे नेते असतानाही त्यांना डावण्यात आले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील सकाळी साडेनऊच्या सुमारास आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार शामल बागल, माजी नगराध्यक्ष कनयालाल देवी यांची भेट घेऊन विकी मंगल कार्यालय येथे आयोजित महायुतीच्या कार्यक्रमाला येणार आहेत. या ठिकाणी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील. या सर्व प्रक्रियेत माजी आमदार नारायण पाटील यांना डावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाटीलही कार्यक्रमाला जातील अशी शक्यता दिसत नाही.

सध्या माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तर ते बंड करतीलच असे जवळपास निश्चित झाले आहे. या परिस्थितीत ज्यांनी मागील लोकसभा निवडणुकीत युती धर्म पाळत भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते असे माजी आमदार नारायण पाटील हे मोहिते पाटील समर्थक मानले जातात. शिवाय निवडणुका जाहीर झाल्यापासून पाटील थोडेसे अलिप्त असल्याचे दिसून येत आहे. त्यांची मनधरणी करणे गरजेचे होते परंतु तसे प्रयत्न भाजपाकडून होताना दिसले नाहीत. उलट त्यांच्या विरोधातील मोठे गट सोबत आल्याने पाटील यांना डावलण्याचे काम या ठिकाणी झाल्याचे दिसून येते आहे.

त्यामुळे भाजपा ने मोहिते यांचे बंड गृहीत धरूनच पुढील रणनीती आखण्यासाठी सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. पण शिंदे गटातील प्रमुख नेते असलेले नारायण पाटील यांचा मागील विधानसभेतील दर्जा पाहता त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये दुर्लक्ष करणे चुकीचे ठरू शकते. विधानसभेतही तशाच पद्धतीचा प्रयोग माजी आमदार नारायण पाटील यांनी हाणून पाडला होता. कोणत्याही पक्षाची उघड सहकार्य नसताना शिवाय ज्या पक्षातून कामे केले त्या पक्षाने तिकीट डावल्यानंतरही अपक्ष राहुन पाटील यांनी आपल्या मतदारसंघावर दबदबा कायम ठेवला होता. करमाळा तालुक्यातील राजकारणात पाटील यांना डावलने भाजपाला कितपत महागात पडू शकेल हा येणारा काळच ठरवेल पण पाटील यांच्या सारख्या नेत्याची आता बीजेपीला गरज नाही असे दाखवल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे दिसुन येत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE