सरकारने मराठा समाजाचा अंत पाहु नये – फंड ; राजकीय व्यासपीठावर न जाण्याचा घुमरेंचा निर्णय
करमाळा समाचार
काही दिवसांपूर्वी माहितही नसलेल्या व्यक्तीने आज मराठा समाजाच्या हितासाठी अन्न व पाण्याचा त्याग केला आहे. त्याच्या जीवाला काही बरं वाईट झाले तर सपुर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सरकारने वेळीच जागे होऊन याकडे लक्ष देण्याचे गरजेचे असल्याचे मत प्राध्यापक मिलिंद फंड यांनी व्यक्त केले आहे. तरी यावेळी उपस्थित असलेल्या विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यासपीठावर चालणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे.


मागील चार दिवसांपासून करमाळा शहरात व तालुक्यात मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळे आंदोलने केले जात आहे. त्यामध्ये तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज सहभागी होत आहे. चार दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी करमाळ्यातही साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला आज महिलांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तर रोज वेगवेगळ्या दोन गावातील कार्यकर्ते येऊन उपोषणाला पाठिंबा देत आहेत. तर आज ब्राह्मण समाजानेही मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
https://youtube.com/live/exC8a2CGBBw?feature=share
यावेळी बोलताना प्राचार्य मिलिंद फंड यांनी मराठा समाज आतापर्यंत शांत बसला असून त्यांच्या शांतीला आव्हान देऊ नका असे सांगितले. तर बरेच जण मराठा समाजाच्या बाबत टिप्पणी करत आहेत ती टिपणी करणाऱ्यांना उलट आम्ही धन्यवाद म्हणून कारण जोपर्यंत मराठा समाजाला डिवचले जात नाही तोपर्यंत मराठा समाज पेटून उठत नाही. त्यामुळे अशा लोकांमुळे आता मराठा समाज भेटून उठला आहे. सध्या शांत असलेल्या समाजाच्या तलवारी केव्हा बाहेर निघतील हे सांगता येत नाही. त्यामुळे सरकारने वेळेत शहाणे व्हावे. त्याशिवाय मराठा समाजाला आज जरांगे सारख्या नेत्याची गरज असून त्यांनी सरकारच्या भूलथापांना बळी पडत आपला जीव गमावू नये अशी भूमिका मराठ्यांच्या आहे. तशी वेळ आल्यास महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी जाहीर केले.
तर यावेळी उपस्थित असलेले विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी आपण जरी सधन असलो. तरी आज बराचसा समाज मागासलेला आहे. त्यांना आरक्षणाची गरज आहे. आपण राजकीय व्यासपीठावर कायम दिसत असलो तरी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत इथून पुढे पुन्हा राजकीय स्टेजवर दिसणार नाही अशी भूमिका यावेळी त्यांनी जाहीर केली आहे. तर वेळोवेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना गरज भासेल त्यावेळी आपण सोबत लढत राहू असेही आश्वासन दिले आहे.