गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये शिवचरित्र गाथा वाचनातून शिवजयंती उत्साहात साजरी
करमाळा –
शनिवारी गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये आगळ्या – वेगळ्या पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक श्री भोगे सर व भोगे मॅडम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. नर्सरी ते युकेजी क्लास च्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, जिजामाता तसेच निरनिराळ्या मावळ्यांच्या भूमिका साकारल्या, तर पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हा दिवस ‘शिवचरित्र वाचन दिन’ म्हणून साजरा केला.

या दिवशी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची ,त्यांच्या चरित्राची त्यांच्या कार्याची महती सांगणाऱ्या, चित्त थरारक प्रसंगाचे वर्णन करणाऱ्या पुस्तकांचे वाचन केले व नंतर त्याचे वर्णन केले. शिवाजी महाराजांविषयी जे काही वाचले आहे ते स्वतःच्या शब्दात वर्णन करणे हा नवोपक्रम गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने राबवण्याचा प्रयत्न केला गेला. विद्यार्थ्यांना इतिहासाबद्दल आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना शिवराय कळावेत, त्यांची युद्धनीती, त्यांचे व्यक्तिमत्व याविषयी माहिती मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात 1175 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिवचरित्र वाचनासोबत जय शिवराय नावाचा जयघोष करत शिवरायांना वंदन करून विद्यार्थ्यांनी साकारले जय शिवराय हे नाव. अशाप्रकारे संस्थेचे संस्थापक मा.श्री.भोगे सर व भोगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दास मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन काटुळे मॅडम यांनी केले.