रस्ताच गेला वाहून, आता घरी जायचे कसे ?
करमाळा समाचार -संजय साखरे
संपूर्ण करमाळा तालुक्याला परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून त्यामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. तर ठिकठिकाण चे रस्ते वाहून गेले असून वाडी वस्तीवर राहणाऱ्या लोकांचा गावाशी संपर्क तुटला आहे .

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागालाही मुसळधार पावसाने झोडपले असून पारेवाडी येथील गुंडगिरे- चव्हाण वस्तीवर जाणारा रस्ता पावसाने संपूर्ण वाहून गेला आहे. राजुरी आणि पारेवाडी तलावातील पाणी मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे नळ्यावर मातीचा व दगडाचा भरावा टाकून येथील ग्रामस्थांनी स्वखर्चाने तयार केलेला रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे.
लवकरच साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होणार असल्याने याचा परिणाम ऊस तोडणीवर व वाहतुकीवर होणार आहे. सध्या या भागात उसाशिवाय केळीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे काढणी योग्य झालेली केळी रस्त्यामुळे काढणे अवघड झाले आहे .दैनंदिन दूध व्यवसाय करणारे लोक,शाळेतील विद्यार्थी यांनाही येणे जाणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे हा रस्ता शासनाने लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केले आहे.

राजुरी आणि पारेवाडी तलावाचे ओव्हरफ्लो चे पाणी आल्याने हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला असून आम्हाला दैनंदिन कामे करताना अडचण निर्माण झाली आहे .आदिवासी लोकांसारखे जगणे येथील लोकांच्या वाट्याला आले आहे.
मनोहर गुंडगिरे, ग्रामस्थ
गुंडगिरे-चव्हाण वस्ती