डिकसळ पुलावरुन वाहतुक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
करमाळा समाचार -संजय साखरे
तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचा जुना असलेला ब्रिटिशकालीन रेल्वे पूल आणि गेली चाळीस वर्षे उजनीच्या पाण्याचा खस्ता खाल्लेला व पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या डिकसळ पुलावरून होणारी जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून आज त्या ठिकाणी मोठे लोखंडी बॅरिकेट्स लावून हा पूल जड वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे.

सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा हा पूल असून पुलाचे दगडी बांधकाम काही ठिकाणी निखळू लागले होते. पाठीमागे स्थानिक ग्रामस्थांनी सिमेंट आणि विटा चा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात त्याची डागडुजी केली होती . हा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा अशी मागणी त्या भागातील नागरिकांनी गेल्या काही दिवसापासून लावून धरली होती.
करमाळा तालुक्यातील नव्हे तर मराठवाड्यातील लोकांना पुणे व मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या पुलाचा वापर होत होता. तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश उसाची वाहतूक या पुलावरूनच बारामती अग्रो, अंबालिका, दौंड ऍग्रो, इंदापूर या साखर कारखान्यांना होत होती. पण आता हा पूल जड वाहतुकीस बंद केल्यामुळे वाहतूकदारांना 50 ते 60 किलोमीटरचा वळसा घालणार आहे.

सध्या उजनी धरण तुडुंब भरले असून धरणा त 117 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कोकणातील सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काही अघटीत घटना घडू नये म्हणून हा पूल प्रशासनाने जड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.I