तालुक्यात चौघा मात्तबरांशिवाय पाचव्या नावाची धमाकेदार एंट्री ; प्रा. झोळ नवा चेहरा मैदानात
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात कायमच गटातटाच्या राजकारणाला प्राधान्य दिले गेले आहे. या ठिकाणी पक्षीय राजकारणाला तितके विचारात घेतले जात नाही. तरीही मागील काही काळापासून पक्षाच्या राजकारणात कल वाढताना दिसत आहे. तालुक्यातील मातब्बर नेते पक्षाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना प्रा. रामदास झोळ यांनी तालुक्यात एट्री केल्याचे दिसून येत आहे. प्रस्थापित नेत्यांविरोधात आव्हान उभा करतील का ? हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

तालुक्याच्या राजकारणात मातब्बर असलेले माजी आमदार जयवंतराव जगताप, विद्यमान आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील व भाजपाच्या नेत्या रश्मी बागल हे नाव सध्या पहिल्या चौघांच्या यादीत असल्याने यांना आव्हान उभा करण्यासाठी मोठं काळीज लागतं अशा परिस्थितीत दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपले साम्राज्य उभा केलेले प्राध्यापक रामदास झोळ यांनी करमाळा तालुक्याच्या राजकारणात एन्ट्री करत तुल्यबळांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

प्राध्यापक झोळ यांनी पहिल्यांदा आपली शिक्षण संस्था उभारली. नावारूपाला आणली व त्यानंतर गाव पातळी तसेच तालुक्याच्या राजकारणात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली. मागील काही काळापासून वेगवेगळी आंदोलने असतील समाजाचे प्रश्न असतील ओबीसी व मराठा विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील अशा सर्वच माध्यमातून झोळ यांनी पुढाकार घेत बाजू मांडलेली आहे. या काळात त्यांनी मकाई, आदिनाथ, कमलाई, म्हैसगाव यासारख्या मोठ्या कारखान्या विरोधात आंदोलन करीत स्वतःचा हेतु काय आणि आपल्यात असलेले धाडस दाखवून दिलं आहे.
मराठा समाजाचे असल्याने मराठ्याच्या प्रश्नाबाबत प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत असताना इतर समाजावरही अन्याय झाला नाही पाहिजे ही भूमिका प्राध्यापक झोळ यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गाव पातळीवर जरांगे पाटील यांचा समर्थक म्हणून त्यांच्याशी बरेच जण जोडले गेले. त्याशिवाय इतर प्रश्नही उपस्थित करून बाजू मांडल्याने विविध भागातील व वेगवेगळ्या जाती धर्माचे लोकही झोळ यांना संपर्क करीत आहेत. यातही सर्वात जमेची बाजू म्हणजे सुशिक्षित चेहरा असल्यामुळे सुशिक्षितांमधून झोळ यांचे नाव समोर येत आहे.
आपण कायमच सुशिक्षित लोकांनी राजकारणात आलं पाहिजे म्हणून नुसत्या चर्चा करतो पण एखादा व्यक्ती राजकारणात येत असताना त्याला मागे पाडण्याचं कामही आपणच करतो. योग्य उमेदवार व योग्य व्यक्ती योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी पोहोचला तर सर्व काही योग्य होतं. त्यामुळे प्रत्येकाला लढण्याची संधी दिली पाहिजे. लोकांची पसंती मिळेल का नाही ही पुढची गोष्ट पण लढण्याआधीच त्याचे पाय खेचणे चुकीचे आहे.
नव्या व्यक्तीने एखादा धंदा सुरू केला तर जुने प्रस्थापित व्यापारी अशा व्यवसायिकाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. भावाची तोल मोल व बदनामी सारखे प्रयोग करून त्याला मागे पाडण्याचा प्रयत्न करतात. तसाच काहीसा प्रकार राजकारणातही दिसून येणार आहे. जे लोक निष्कलंक आहेत त्यांच्या काहीतरी उणीवा काढून आपल्या रस्त्यातून बाजूला काढण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जातील. असाच काहीसा प्रकार जो यांच्याबाबतही घडत आहे अशा चर्चा कार्यकर्त्यांमधून सुरू आहेत. विशेष म्हणजे जितका विरोध यांच्या एंट्रीला होतोय तितकाच पाठिंबाही त्यांना मिळू लागल्याचे दिसून येत आहे.
झोळ यांच्या तालुक्याच्या राजकारणात प्रवेशामुळे नेमका कोणाला हादरा बसेल व कोणाचा फायदा होईल हा येणारा काळ ठरवेल. पण त्यांच्या एन्ट्रीने अनेकांच्या पायाखालची वाळू नक्कीच सरकलेली दिसून येत आहे. त्यामुळेच चर्चेत नसलेल्या चेहऱ्याला सध्या चर्चिले जाऊ लागले आहे. केवळ काही दिवसांच्या काळात चौघांच्या राजकारणात पाचव्याची अलगद अशी इंट्री झाल्याने जमेची बाजू ठरत आहे. येणाऱ्या काळात नेमके कोणत्या पक्षाकडून किंवा गटाकडून झोळ उभा राहतात किंवा अपक्ष उभा राहतात यावर तालुक्याची गणिते अवलंबून राहणार आहेत.