शिक्षकांची अपुरी संख्या १ ली ते ७ वी ला शिकवतात दोनच शिक्षक ; मंत्री केसरकर आज करमाळ्यात
करमाळा समाचार
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांअभावी अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली असून त्यापैकीच एक सातोली या जिल्हा परिषद शाळेवर पहिली ते सातवीसाठी 95 पटसंख्या असताना केवळ दोनच शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी त्या ठिकाणी शिक्षक नेमण्याची मागणी केली आहे. मागील वर्षभरापेक्षा जास्त काळापासून या ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे पालक वर्गात नाराजी आहे. आज शिक्षणमंत्री दिपक केसरकर उर्दु शाळेचे वर्ग वाढवल्यानिमित्ताने सत्कार स्वीकारणसाठी तालुक्यात येणार आहेत. अशा इतर काही शाळातही अशी परिस्थिती आहे. त्यांनी या बाबींकडे लक्ष दिले तर तालुक्याची शैक्षणिक प्रगती होईल.

याबाबत ग्रामस्थांनी शिक्षणाधिकारी यांच्यासोबत पत्र व्यवहार केला असून त्यांनी गावातील परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली आहे. सातोली शाळेवर कोरोना काळापासून विद्यार्थी संख्या वाढत गेली. परंतु शिक्षक संख्या मात्र आहे तेवढीच राहिले आहे तशी परिस्थिती असतानाही शिक्षण विभागाकडून याकडे लक्ष दिले जात नाही या विषयाकडे गावकऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

सातोली शाळेवर एक शिक्षक व एक मुख्याध्यापक अशा दोनच शिक्षकांची भरती करण्यात आलेली असल्याने दोघांपैकी एक शिक्षक कामानिमित्त नसेल तर एकट्याने संपूर्ण सात वर्ग कसे सांभाळायचे ? दोनच शिक्षक सात वर्ग सांभाळत असतील तर मुलांच्या गुणवत्तेवर त्याचा प्रभाव पडत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सदरच्या जागा भराव्यात अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा शाळेला कुलूप लावावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.