आषाढीवारीला यंदा वारकऱ्यांसाठी इस्त्री, मसाज व विविध सुविधा ; सर्वात मोठी पालखी ९ ला दाखल
करमाळा समाचार
आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक, अहमदनगर सह इतर जिल्ह्यातून येणाऱ्या पालख्या या करमाळा मार्गे पंढरपूरकडे रवाना होतात. सर्वात मोठी असलेली श्री संत निवृत्ती महाराज पालखी यांना ९ जुलै रोजी रावगाव येथे येत आहे. या सर्वांच्या आगमनाच्या अनुषंगाने तालुका पंचायत समिती व प्रशासन सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

आषाढीवारी निमित्ताने करमाळा भागात येणारी सर्वात मोठी दिंडी निवृत्तीनाथ महाराज ही आहे. या पालखीसह जवळपास ७० ते ८० हजार वारकरी सहभागी होण्याचा अंदाज आहे. तर दरवर्षी ५० हजारांपेक्षा जास्त वारकरी या दिंडीत सहभागी असतात. याशिवाय पैठण व इतर भागातून येणाऱ्या मोठ्या दिंडी या गावोगावी वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करतात व पुढे प्रस्थान करतात. रावगाव, जातेगाव या भागातून प्रवेश करतात. तर करमाळा मार्गे जेऊर व कंदर या ठिकाणी मुक्कामी असतात.

हजारो वारकऱ्यांची सोय करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या निमित्ताने प्रत्येक गावात जवळपास २२५ शौचालय आणि शंभर शॉवर सहित सस्नानगृह उभारण्यात येत आहेत. बसण्यासाठी वॉटरप्रूफ मंडप दिला गेला आहे. तर पिण्याच्या पाण्याचे १८ टँकर देण्यात आले आहेत. याशिवाय महिलांना विश्रांती आणि लहान मुलांच्या स्तनपानासाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष उभारण्यात येत आहे अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली.
मसाज, इस्त्री सह इतर सुविधा …
मागील वेळी ही पंचायत समिती व प्रशासनाच्या वतीने विविध सुविधा देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये वारकऱ्यांची फुट मसाज या सुविधेला वारकऱ्यांनी पसंती दिली होती. तर यंदा औषधोपचार व इतर सुविधांसह वारकऱ्यांची चप्पल दुरुस्ती, इस्त्री करणे, दाढी कटिंग व झेंडू बाम वाटप अशा सुविधाही दिल्या जाणार आहेत. या सर्व सुविधा देवळाली ग्रामपंचायत या ठिकाणी दिल्या जाणार आहेत.