करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

जन सन्मान यात्रेत जयवंतराव जगताप व राष्ट्रवादी नावापुरतेच ; जगतापांची अनुपस्थितीत चर्चेचा विषय

करमाळा समाचार 

इतर ठिकाणी पोचल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार जाहीर करणारे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी मात्र करमाळ्यात सावध भूमिका घेत अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांना एक प्रकारे अपक्ष उभा राहण्यासाठी हिरवा कंदील दिल्याचे दिसून आले. सदरच्या कार्यक्रमाला माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा कागदोपत्री नाव असतानाही त्यांनी गैरहजेरी लावल्याने चर्चेचा विषय ठरला. तर कार्यक्रमांमध्ये महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपाच्याच बागल यांच्या विरोधात भाष्य करत माजी आमदार नारायण पाटील यांच्या वडिलांनी आदिनाथ बाबत केलेल्या कामाचे कौतुक करतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार दिसले.

आता पर्यत करमाळा तालुक्याला ३००० कोटींचा निधी दिला असुन पुन्हा एकदा संजयमामा निवडुन दिल्यास निधी ५ हजार कोटी पर्यत देऊ असेही जाहीर केले. पण तीन हजार कोटींवर आता विरोधक प्रश्न उपस्थित करु लागले आहेत. तर कोनशिलेसह कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार व शिंदेंसाठी किंगमेकर ठरलेले जयवंतराव जगताप अनुपस्थितीत राहिल्याने येणाऱ्या निवडणूकीत जगताप वेगळ्या मुड मध्ये आहेत अशा चर्चाना उधान आले आहे. 

politics

मंगळवारी करमाळा येथे जनसन्मान यात्रे निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. यावेळी उपस्थित महिला व शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करताना पवार यांनी संबंधित योजना जाहीर करून टाकली. करमाळा तालुक्यात मौलाली माळ येथे प्रशासकीय इमारत व झरे येथे सावडी वेणेगाव या ७१ किमी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन यावेळी अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्ष महिला आयोगाच्या प्रमुख रूपाली चाकणकर यांच्यासह आमदार बबनराव शिंदे व आमदार संजय मामा शिंदे उपस्थित होते. यावेळी कुठेही राष्ट्रवादी व चिन्हाचा उल्लेख नसल्याने येणाऱ्या काळात संजयमामा हे अपक्ष लढु शकतील आणि त्याला आजच अजितदादाकडुन हिरवा कंदिल देण्यात आला.

करमाळा तालुक्यात जनसमान यात्रेचे आगमन झालं या जनसंमान यात्रेचे नेतृत्व अजितदादा पवार हे करीत आहेत. यांच्या स्वागताला करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. पण यावेळी आ. शिंदेंचे पाठिराखे माजी आमदार जयवंतराव जगताप मात्र उपस्थित राहिले नाहीत. यावेळी अजितदादा यांनी संपूर्ण कामाचा लेखाजोखा सांगितला. तर येणाऱ्या काळात लाडकी बहीण, लाडका भाऊ व शेतकरी सन्मान याबाबत बोलताना सर्वांना समाधानी केले जाईल व विविध योजनांची माहिती यावेळी अजितदादा पवार यांनी दिली.

केवळ लाडकी बहीण योजना आणली नसून आमच्या लाडक्या भावांनाही समाधानी करण्याचं काम सरकारने केले आहे. महाराष्ट्रातील साडेसात हॉर्स पावर वीज वापरणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना मागील व पुढचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यामध्ये ४४ लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. शिवाय दूध दरातही सात रुपयांचे अनुदान दिल्याने लाडक्या भावाला समाधानी केले असल्याचे सांगत येणाऱ्या पंधरा दिवसात तुमच्या वीज बिलावर शून्य आकडा येणार असून कोणीही वीज बिल भरू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळा येथे बोलताना केले.

करमाळा तालुक्यात आज पर्यंत कोणत्याच आमदाराने इतका निधी आणला नसेल तेवढा त्यापेक्षा जास्त निधी आ. संजयमामा शिंदे यांनी आणून दाखवला आहे. तर येणाऱ्या काळात पुन्हा एकदा त्यांना नेतृत्व संधी दिल्यास करमाळा तालुक्यातील बंद पडलेले आदिनाथ व मकाई कारखाने पुन्हा एकदा सुरू करून वाढीव निधी देण्याचे काम आपण करू असे जाहीर करताना कारखाने बंद पडायला बागल कारणीभूत असल्याचे अधोरेखित केले. पण सध्या बागल हे पण महायुतीत आहेत याचा विसर पडला की अंतर्गत धुसफुस आहे हे समजले नाही. तर आदिनाथ व मकाई साखर कारखाने सुरू करण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या वडीलांनी घेतलेल्या भूमिकेचे यावेळी अजितदादा यांच्याकडून कौतुक करण्यात आलं. यावेळी गोविंद बापू पाटील यांनी आदिनाथ साठी साखर निर्मितीपर्यंत चप्पल घातली नसल्याचेही त्यांनी आठवण करून दिली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE