सात ऑगस्ट च्या शांतता रॅलीत बहुसंख्येने सहभागी व्हा : समन्वयक माऊली पवार
करमाळा समाचार – संजय साखरे
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीची सुरुवात सोलापुरातून होणार आहे. या शांतता रॅलीसाठी करमाळ्यातील मराठा बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हा असे आवाहन सोलापूर जिल्हा मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी केले.
आज करमाळ्यातील विकी मंगल कार्यालय येथे दुपारी दोन वाजता करमाळा तालुक्यातील सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी करमाळा शहर व तालुक्यातील हजारो मराठा समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले होते. यावेळी माऊली पवार बोलत होते.

सरकार जाणून-बुजून मराठा व इतर समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आपला लढा हा कोणत्याही जातीच्या व धर्माचे विरोधात नसून आपल्याला आपल्या हक्काचे 50% च्या आतून ओबीसी आरक्षण मिळवायचे आहे व आपल्या लेकरा बाळांचे भवितव्य सुरक्षित करायचे आहे म्हणून सर्व मराठा समाज बांधवांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी आहेत.
दिनांक सात ऑगस्टला सोलापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे . त्यानंतर पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात होईल तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅली आल्यानंतर चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा होईल.

करमाळा तालुक्यातील या बैठकीसाठी माऊली पवार, प्रा. गणेश देशमुख, प्रा. शिवाजी शिंदे, जीवन यादव, वैभव पवार यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील मराठा समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करमाळा तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राचार्य मिलिंद फंड यांनी केले.