पंधरा ते वीस वर्षांपासून वादात असलेला कंदर–सातोली शिवरस्ता अखेर खुला
करमाळा –

सातोली परिसरातील गेल्या १५ ते २० वर्षांपासून वादात अडकलेला सुमारे २ कि.मी. लांबीचा शिवरस्ता काल दि. ११ मार्च २०२६ रोजी अतिक्रमण दूर करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
या रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवून सर्व खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले. त्यामुळे आता हा रस्ता शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी सोयीचा झाला आहे. या रस्त्याचा फायदा अंदाजे ५०० ते ६०० शेतकरी तसेच २०० ते २५० शाळकरी लहान मुलांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


सदरची कारवाई तहसिलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्रीमती नागटिळक (केम), ग्राम महसूल अधिकारी सायली शिंदे (वडशिवणे) यांच्याकडुन करण्यात आली. तसेच करमाळा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हस्के व त्यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त उपस्थित होता. हे काम सकाळी १०.३० वाजता सुरू होऊन रात्री ८.३० वाजेपर्यंत सुरू होते आणि अखेर रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
स्थानिक शेतकरी व नागरिकांनी प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.

