अवैध वाळुसाठ्यावर करमाळा पोलिसांची कारवाई ; एकावर गुन्हा दाखल
प्रतिनिधी – करमाळा
वाळूचा साठा केल्याप्रकरणी वांगी क्रमांक एक ता. करमाळा येथील उमेश दादा दैन यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उजनी जलाशयाच्या पात्रातून सदर वाळू उपसा करून वांगी क्रमांक एक येथे उजनी जलाशयाच्या संपादित केलेल्या मोकळ्या पात्रात सरकारी विहिरीजवळ सदरचा वाळू साठा करण्यात आला होता. यावेळी १० ब्रास वाळू किंमत साठ हजार रुपये अशी मिळून आली आहे. करमाळा पोलिसांच्यावतीने दैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना वांगी क्रमांक एक येथे उजनी जलाशयाच्या जवळ भुसंपादित केलेल्या मोकळ्या नदी पात्रात सदर वाळू साठा होत असल्याबाबत माहिती मिळाली होती.

यावेळी कोकणे यांनी एक पथक वांगी क्रमांक एक च्या दिशेने रवाना केले. दि १६ रोजी पथक सांगितलेल्या ठिकाणी पोहचल्यानंतर तेथे दहा ब्रास वाळू मिळून आली आहे. यावेळी त्या ठिकाणच्या तलाठ्यांना सदर ठिकाणी वाळू लिलाव वगैरे काय झाले आहेत का यासंदर्भात विचारपूस केली.
यावेळी लिलाव बंद असले बाबत माहिती मिळाली. त्यानंतर आजूबाजूला चौकशी केल्यानंतर सदरचा वाळू साठा हा उमेश दैन रा. वांगी क्रमांक एक यांचा असल्याचे माहिती मिळाली. त्यानंतर कोणताही परवाना नसताना अनाधिकृतपणे वाळूचा साठा विक्रीकरिता ठेवलेला असल्यामुळे दैन यांच्यावर करमाळा पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहे.