करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्याची भेट ; लोकांच्या मागणीसाठी केली आग्रही मागणी
करमाळा समाचार -संजय साखरे
करमाळा तालुक्यातील पोमलवाडी ते इंदापूर तालुक्यातील चांडगाव या दोन गावांना उजनी जलाशयातून जोडल्या जाणाऱ्या पुलास निधी उपलब्ध करून द्या अशी आग्रही मागणी करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या करमाळा मतदारसंघातील पोमलवाडी ते चांडगाव तालुका इंदापूर या दरम्यान भीमा नदी पात्रावर पूल झाल्यास गोवा- कोल्हापूर- सातारा- फलटण -नातेपुते – वालचंद नगर- लोणी देवकर- -चांडगाव ते पोमलवाडी -कोर्टी -करमाळा / राशिन- अहमदनगर औरंगाबाद हा मार्ग जोडला जाणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा एकमेकाला जोडले जातील. या दोन गावातील अंतर फक्त ७३७.३९५ मीटर असून दोन्ही बाजूला अप्रोच रस्ते पूर्वीपासून आहेत. त्यामुळे संपादनाची आवश्यकता भासणार नाही.
सदर पूल झाल्यास पर्यायी मार्गाची व्यवस्था होऊन दळणवळण वाढीस लागणार आहे. बाजारपेठा जवळ आल्याने उद्योगधंद्यांचा विकास होऊन रोजगार उपलब्ध होईल. व शेतीपूरक व्यवसायाचा विकास होऊन पर्यटन वाढीस चालना मिळेल.

आजही या ठिकाणी दिवसभर लाँच द्वारे प्रवासी वाहतूक चालू असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आपल्या स्तरावर निधी उपलब्ध झाल्यास हा एक विकास मार्ग ठरणार आहे.त्यामुळे यासाठी निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी आमदार श्री संजय मामा शिंदे यांनी केली आहे.