पोलिस असल्याचे सांगुन एकाचे सोने आणी घड्याळ केले लंपास
प्रतिनिधी | करमाळा
पोलीस असल्याची बतावणी करत ४५ वर्षाच्या एकास दोन अनोळखी व्यक्तींनी फसवणूक करून सोन्याची चैन व घड्याळ असा मुद्देमाल नेला आहे. सदरचा प्रकार शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास कृष्णाजी नगर परिसरातील कृष्णा हार्डवेअर शेजारी घडला आहे. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजिनाथ राऊत (वय ४५) चांदगुड गल्ली रा. करमाळा यांनी फिर्याद दिली आहे. राऊत यांचा दुधाचा व्यवसाय असून रोज नेहमीप्रमाणे ते करमाळा शहरात दुध घालतात. शनिवारी ते दूध घालण्यासाठी करमाळ्यात पायी चालत आले होते. दूध घालून ते माघारी देवीचामाळ रस्त्याने जात असताना कृष्णाजी नगर येथे आल्यानंतर कृष्णा हार्डवेअर समोर दोन अनोळखी व्यक्ती उभारलेले दिसली. त्यांनी राऊत यांना रस्त्याच्या बाजूला बोलवले.
“आम्ही पोलिस आहोत येथे चौकशी चालू आहे, तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा तसेच काही वस्तु असल्यास पटकन द्या ” असे म्हटले. त्यावेळी राऊत यांनी हातातील घड्याळ, गळ्यातील पिवळ्या रंगाची दिड तोळ्याची सोन्याची चैन असे त्या दोन व्यक्तींकडे रुमालात गुंडाळून ठेवल्या. तो रुमाल त्यांनी राऊत यांना परत दिला.

पण काही वेळानंतर पाहिल्यानंतर त्या रुमालात घड्याळ व चैन नसल्याचे दिसून आले. त्यावेळी राऊत यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले यावेळी ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळून नेला होता. सदरचा घडलेला प्रकार राऊत यांनी पोलिसांना सांगितल्यानंतर दोन अनोळखी विरोधात करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदरच्या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार संतोष देवकर हे करीत आहेत.