तालुका विधी सेवा समिती, करमाळा वकील संघ व करमाळा पंचायत समिती यांच्या वतीने कायदेविषयक शिबीर संपन्न
करमाळा समाचार
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख महत्त्वाचे आहे. जर सुख मिळवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने जीवनामध्ये व्यसनमुक्त राहणे आवश्यक आहे, असे मत करमाळा न्यायालयातील वरीष्ठ स्तर न्यायाधीश व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस.एम. घुगे यांनी व्यक्त केले.

तालुका विधी सेवा समिती, करमाळा वकील संघ व करमाळा पंचायत समिती यांच्या वतीने पंचायत समिती सभागृहात आयोजनात कायदेविषयक शिबिरात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश ए. के. शर्मा, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.पी. कुलकर्णी याशिवाय वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर.बी. निळ उपाध्यक्ष अॅड. अलीम पठाण यांच्यासह आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते डॉ. अॅड. बाबूराव हिरडे, ॲड. राहुल सावंत, ॲड . बलवंत राऊत, ॲड. प्रशांत बागल, ॲड. विक्रम चौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना न्यायाधीश घुगे म्हणाले की, समाजामध्ये या ना प्रकारची व्यसने आहेत. त्यातून वेळ, पैसा व आरोग्य बरबाद होते. त्यामुळे निग्रह करून व्यसनमुक्त झाले पाहिजे. असे त्यांनी आवाहन केले तसेच जे दिव्यांग आहेत त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांची भाषा समजून घेणाऱ्या व्यक्तीचे नेमणूक केली असून त्यांना न्यायालयात न्याय दिला जातो. समाजामध्ये सक्षम माणसांनी प्रत्येक ठिकाणी दिव्यांग मंडळींना सहकार्य करावे असेही आवाहन केले.

यावेळी बोलताना अॅड. हिरडे यांनी व्यसनाचा आजार केवळ एका व्यक्तीचा नसून तो संपूर्ण परिवाराला झालेला आजार असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने व्यसनात पडण्यापूर्वी स्वतः सतर्क राहणं गरजेचं आहे एकदा व्यसनात पडल्यानंतर त्यातून बाहेर पडणे फार कठीण असते. त्यामुळे आपल्या उत्तम भविष्यासाठी व्यसनमुक्त रहाणे अवश्यक आहे.
ॲड. राहुल सावंत यांनी नागरिकाचे मूलभूत कर्तव्य व शासकीय विविध योजना याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. बी. आर. राऊत यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरीष्ठ लिपीक आर.पी. खराडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार अॅड. विक्रम चौरे यांनी मानले. यावेळी पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक श्री जरांडे व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
