१५ ते १८ वयोगटातील लसीकरणात मोठा बदल ; जेऊर हेलपाटा वाचवण्यासाठी महत्वपूर्ण माहीती
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या लसीकरणात मोठा बदल करण्यात आला आहे. तालुक्यात केवळ एकाच ठिकाणी म्हणजेच जेऊर येथे सुरू असलेल्या लसीकरणात आता ऑन दी स्पॉट जाऊन रजिस्ट्रेशन करून लस घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जेऊर मंडळाच्या बाहेरून येणाऱ्या लाभार्थ्यांना याचा त्रास होऊ शकतो. रोजच्या क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्यास अधिक वाढलेल्या लोकांचे काय करणार हा मोठा प्रश्न आहे.

सर्वात आधी करमाळा तालुक्यात लसीकरण सुरू झाले. यावेळी सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. पण तालुक्यात केवळ एकाच ठिकाणी लसीकरण असल्याने आता त्याचा त्रास जाणवू लागला आहे. पहिल्या दिवशी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची सोय होती. त्यात ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून 96 लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला होता.
पण दुसऱ्या दिवसापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंद झाले आहे. जेऊर या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागत आहे. एका दिवसात जास्तीत जास्त 500 लाभार्थ्यांना लसीकरण केले जाऊ शकते. पण तालुक्यातून पंधरा ते वीस किलोमीटर लांब होऊन येणाऱ्या लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी दुसऱ्यांदा हेलपाटे मारावे लागणार असतील तर याचा त्रास होऊ शकतो.

सध्या ऑनलाईन शिक्षणामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. तसेच नेटही उपलब्ध आहे. त्या सर्वांनी ऑनलाईन नोंदणी करण्याची सोय त्यांना दिल्यास प्रत्येक जण आपापल्या परीने ऑनलाईन नोंदणी करून लसीकरणाच्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीचा अवलंब व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
तर शहर व तालुक्यात बऱ्याच ठिकाणाहून लसीकरणाची मागणी होत आहे. त्यामुळे करमाळा शहरात मोठ्या शाळा सोडून त्या ठिकाणी स्वतंत्र उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरण शिबिर सुरू करावे तसेच ग्रामीण भागात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची सोय करण्यात यावी अशी मागणी पालकांमधून होत आहे.