राजमाता जिजाऊ जयंती व सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने एकल महिलांचा मेळावा
जेऊर प्रतिनिधी – करमाळा समाचार
राजमाता जिजाऊ जयंती व सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने जेऊर येथे एकल महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे आयोजन विजया कर्णवर व ॲड. सविता शिंदे यांनी केले होते.

याप्रसंगी ॲड. सविता शिंदे म्हणाल्या की, देशामध्ये 2011च्या जनगणनेनुसार सात कोटी 14 लाख एकल महिला आहेत. विधवा, परित्यक्ता व अविवाहित अशा एकल महिलांचे अनेक प्रश्न असून त्यांना दैनंदिन जिवनात रेशनिंग कार्ड, निवाऱ्याचा अभाव, सामाजिक असुरक्षितता, मानसिक व शारीरिक आरोग्य तसेच बेरोजगारीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

शासकीय योजनांच्या माहितीचा अभाव, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होणारी अडवणूक हे एकल महिलांच्या समस्या सोडवण्यातील येईल प्रमुख प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी एकल महिलांनी संघटित होणे गरजेचे आहे त्यासाठी आपण गावोगावी जाऊन प्रयत्न करणार असल्याचे ॲड. सविता शिंदे यांनी सांगितले विजया कर्णवर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की एकल महिलांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडविण्यावर आम्ही भर देणार आहोत.
त्यासाठी एकल महिलांनी एकत्र येणे गरजेचे आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयमाला चौरे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष नलिनी जाधव, राष्ट्रवादी महिला करमाळा शहराध्यक्ष राजश्री कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा कर्चे यांची भाषणे झाली. उपस्थित महिलांनी आपल्या समस्या सांगितल्या. जयश्री सलगर यांनी आभार मानले.
राष्ट्रवादी महिला तालुका उपाध्यक्ष नंदिनी लुंगारे, मनिषा ठोंबरे, शारदा सुतार, दिपाली पंढरे, जनाबाई पवळे, सुजाता थोरात, शांताबाई काळे, वैशाली घोडके आदि शेकडो महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रमात स्वामी विवेकानंद यांना व सोलापूरच्या चार हुतातम्यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुष्पा कर्चे, शारदा सुतार, जनाबाई पवळे, वैशाली घोडके यांनी परिश्रम घेतले.