लाखोंचा गंडा घालणारा कांबळे पुन्हा एका लोकांच्या जखमेवर मीठ चोळताना ; नेमके काय आहे प्रकरण ?
करमाळा समाचार
मागील दीड ते दोन वर्षांपासून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालून फरार असलेला संशयित आरोपी सागर कांबळे बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा दिसून आला आहे. पण अजूनही पोलिसांच्या कचाट्यातुन तो बाहेरच असल्याने पोलीसांचं त्याला पकडण्यात अपयश दिसून येत आहे. बऱ्याच दिवसांनी सागर कांबळे हा फेसबुक वर ऑनलाईन आलेला दिसून आला आहे.


अर्ध्या किमतीमध्ये शिलाई मशीन, सायकल, मोटर सायकल, जेसीबी, ट्रक्टर अशा वस्तू देण्याच्या आमच्या पोटी मोठ्या नेत्यांना सोबत घेऊन त्यांच्या नावाच्या व पदाचा वापर करून सागर कांबळे यांनी ग्रामीण भागात आपले प्रस्थ वाढवले होते. अर्ध्या किमतीत वस्तूंची आमिष दाखवल्याने अनेकांना सुरुवातीला त्याच्यावर विश्वास ही बसला होता. बऱ्याच जणांना त्यांनीही शिलाई मशीन व पिठाची चक्की दिली होती. त्यामुळे त्यावर अधिकच विश्वास बळावला त्याचाच फायदा घेत त्याने नंतर मोटारसायकल देण्याचे आमिष लोकांना दाखवले दरम्यान ट्रॅक्टर व जेसीबी ही निम्म्या किमतीत देण्याचे त्याने कबूल केले होते.
पण सुरुवातीला देण्यात आलेल्या सायकली या ही उधारी वरच आणलेल्या होत्या हे सागर कांबळे फरार झाल्यानंतर उघडकीस आले. तर त्यामधील निम्म्या किमतीत वसुली तसेच मोटरसायकली व ट्रॅक्टर जेसीबी सारख्या वस्तू साठी घेतलेले पैसे सर्वच घेऊन सागर कांबळे रात्रीतून फरार झाला. तेव्हापासून करमाळा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पण अद्याप तो नेमका कुठे व कसा आहे हे पोलिसांना मिळून आले नाही. आज बर्याच दिवसांनी सागर कांबळे च्या फेसबुक वॉलवर त्याने नमस्कार असं सिम्बॉल टाकून पुन्हा एकदा फसवणूक झालेल्या सर्वांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याचे दिसून आले आहे. आता तरी पोलिस गांभीर्याने त्याचा तपास करतील का त्यांनी त्याचा विषय सोडून दिला आहे हा प्रश्न पुन्हा एकदा प्रकाशात येत आहे.