मनसेचा इशारा, पोलिसांची तंबी नंतर आगाराची माघार ; गेट खुले झाल्याने नागरीकात समाधान
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील बसस्थानकातील उत्तर दिशेचे गेट बंद असल्याने संगम चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. ते गेट उघडण्यास संदर्भात अनेक संघटनांनी विरोध केला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी इशारा दिल्यानंतर गेट खुले करण्यात आले आहे. तर पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनीही बस डेपो ची वाहतूक संगम चौकाकडून करू नये याबाबत पत्र दिले आहे.


तालुक्यात मुख्य रस्त्यालगत करमाळा बस स्थानकाचे आगार आहे. सोलापूर जिल्ह्यात करमाळा बस स्थानक मोठ्या जागेत विस्तारलेले आहे. जिल्ह्यात मोठे असणाऱ्या बस स्थानकामध्ये करमाळ्याचाही नंबर सर्वात आधी येतो. तर बस स्थानकाला तीन मोठे गेट आहेत. त्यामध्ये पूर्व बाजूस येण्या आणि जाण्यासाठी एक तर उत्तरेकडील गेटमधून अहमदनगर, बार्शी, उस्मानाबाद आशा भागात जाण्यासाठी बस स्थानकाबाहेर पडण्यात व येण्यासाठी उपयोगात येणारे उत्तरेकडील गेट आहे.
बाहेरच्या वाहनांची प्रवेश बंद करण्यासाठी गेट बंद करण्यात आला होते. पण त्याचा अडथळा सामान्य नागरिकांना होत होता. ते गेट बंद केल्यानंतर संगम चौक येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा अडथळा होऊ लागला होता. अनेकदा या संदर्भात आगार प्रमुखांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. तर यापूर्वीही शहरातील नागरिक व आगारप्रमुख यांची वाद झाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे गेट खुले करण्यात आले होते. पण लॉकडाऊन च्या काळात पुन्हा एकदा गेट बंद केल्याने ते आजतागायत खुले करण्यात आले नव्हते.
त्यामुळे ते गेट खुले करावे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष संजय घोलप यांनी आगार प्रमुख यांनी मागणी केली की गेट खुले करावे अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले त्यानंतर पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडळे यांनीही संगम चौकात होणाऱ्या ट्रॅफिक जामला बस स्थानक जबाबदार असल्याचे निदर्शनास येत असून त्या भागातून बस ची वाहतूक पूर्ण बंद करावी अशी मागणी केली. याबाबतचे पत्रही त्यांनी संबंधित विभागाला दिले आहे. त्यानंतर आगार प्रमुखांनी उत्तरेकडील गेट खुले करून हा वाद संपला आहे. तर मनसे व इतर संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर हे काम पूर्ण झाल्याने नागरिकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बस आगार प्रमुख आजही आपली भुमीका बदलायला तयार नाहीत. बसेस मुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर पोलिस निरिक्षक पाडुळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नक्कीच फायदा झाला आहे. त्यांनी संगम चौकातून जाणाऱ्या एसटीला प्रतिबंध केल्यामुळे एसटी डेपोला जुन्या बायपास रोडचे पूर्वेकडील गेट उघडावे लागले. त्यामुळे संगम चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
– संजय घोलप,
मनसे तालुकाध्यक्ष