निर्लज्जम् सदा सुखी … एस टी चा भोंगळा कारभार सुरुच ; तुम्हाला दीड हजार रुपये पाहिजे का मुलींची सुरक्षा निर्णय घ्या
करमाळा समाचार
मागील बऱ्याच दिवसांपासून तालुक्यासह वेगवेगळ्या ठिकाणी एसटी बंद पडण्याचे प्रमाण दिसून येत तर त्यातून काही अपघातही घडले आहेत. तरीही शासन मात्र सर्वकाही अलबेला असल्याचं सांगत आहे. महिलांना अर्धे तिकीट व वृद्धांना मोफत केल्यानंतर एसटी मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली. पण गाड्यांची सोय कोण करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या महिलांना दीड हजार रुपयांचा आमिष दाखवून इतर प्रश्न मात्र दाबले गेल्याचे दिसून येत आहे. प्रशासन व शासन असल्या खराब गाड्या ग्राहकांवर लादत आहे नेमका निर्लज्जपणा कोण करते हे कळत नाही.

सामान्य लोकांना खाजगी गाडीचा प्रवास परवडत नसून आज तागायत एसटीने मोठ्या प्रमाणावर गोरगरिबांना साथ दिली. त्यांच्यासाठी एसटीचा प्रवासच आलिशान कारचा प्रवास असल्याचे दिसून आले आहे. कितीही खराब परिस्थिती असली कशीही गाडी असली तरी आजपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कधीही एसटीला नावे ठेवलेली नाहीत. पण आता तर एसटीने कहरच केला आहे. वारंवार व रस्त्यात मध्येच कुठेतरी बंद पडणे व बिघाड होणे हे नित्याचे झाले आहे. अशी परिस्थिती असताना गाड्यांची काहीच अडचण नाही सर्व काही अलबेल आहे अशा माहिती पुढे दिली जाते व त्यामुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

काही दिवसांपूर्वी एक सहल गेली दूरचा पल्ला गाठण्यासाठी गेली होती. रस्त्यामध्ये खोल डोंगरदरी असताना मध्येच एका गाडीला बिघाड झाला. सुदैवाने मोठा अपघात टाळला. पण अशा बसचा अपघात झाला असता तर त्या चिमुकल्या जीवांच्या काही बरे वाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण ? पुन्हा जबाबदारी देऊन उपयोग होता का ? अशा परिस्थितीत शिक्षक व आगाराचे प्रमुख हे तितकेच जबाबदार असल्याचे दिसून येते. बिघाड होणाऱ्या किंवा बिघडत असलेल्या बस सहलीला दिल्या कशा हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
बस तर रोजच बंद पडत आहेत. पण काही वेळापूर्वी मांगी येथे आलेली बस ही तब्बल दीड तास एकाच जागेवर उभा होती. त्या ठिकाणी शाळेसाठी आलेल्या मुलींना घरी जाण्यासाठी तब्बल दीड तास उशीर झाला. मग खात्यावर महिन्याला दीड हजार रुपये येत आहेत ते महत्त्वाचं आहे का ज्या मुली आपल्या शाळा सुटल्यानंतर घराबाहेर असुरक्षित आहेत त्या घरी पोहोचणं महत्त्वाचं आहे हे आता लोकांनी ठरवले पाहिजे. नियोजन बघत असलेले निर्लज्ज झाले असले तरी जे सहनशील आहेत त्यांनी आता निर्णय घेणे गरजेचे आहे.