आता नव्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी व काँग्रेस आमने-सामने येण्याची शक्यता
करमाळा समाचार
अजितदादा पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने तात्काळ विरोधी पक्षनेता व प्रतोतपदी जितेंद्र आव्हाडांची निवड करण्यात आली होती. पण आता त्याला कॉग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांनी विरोध दर्शवल्याचे दिसुन येत आहे. ज्यांची संख्या जास्त त्यांचाच विरोधीपक्ष नेता असे गणीत असल्याचे त्यांनी आवर्जुन आठवण करुन दिली असली तरी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसुन निर्णय घेतील असेही सागितले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व विजय वडेट्टीवार यांनी नुकताच पत्रकारांशी बोलताना याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सुरू असलेल्या सर्व प्रकरणावर महाविकास आघाडीत कसलाही फरक पडला नसल्याचेही सांगितले आहे. मात्र विरोधी पक्ष नेता एकटी राष्ट्रवादी ठरवत नसून ज्यांचे जास्त आमदार आहेत त्यांनाच ती संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार पुन्हा एकदा कामाला लागले असून त्यांनी आज कराड येथे प्रीतीसंगमावर दाखल झाले आहेत.या ठिकाणी ते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर आले आहेत. त्या ठिकाणी अभिवादन करून त्यांच्यासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या ठिकाणाहून ते पुढील दिशा ठरवणार आहेत. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हेही त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत. तर विरोधी पक्ष नेते च्या विषयावरून यावेळी नेमकं काय बोलतील का किंवा बैठकीत यावर चर्चा होईल याकडेही लक्ष लागून राहील.