अधिकाऱ्यांचे आश्वासन पण कारवाईचा पत्ता नाही ; खाओ आणि खिलाओ पद्धतीमुळे नुकसान ?
करमाळा समाचार
करमाळा आवाटी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसात देवीचामाळ परिसरातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याला अद्याप एक महिना ही पूर्ण झालेला नसताना सदरची डागडुजी करण्याची वेळ येत असेल तर रस्ता किती प्रमाणात निकृष्ट दर्जाचा तयार करण्यात आला आहे असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. विशेष म्हणजे सदरच्या रस्त्याला क्लीनचिट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम केले नसल्याचे भीमदलचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांनी म्हटले आहे.

देवीचामाळ परिसरात रस्ता तयार करण्यात आला. मात्र अतिशय घाईगडबडीत सदरचा रस्ता तयार केल्याची दिसून आले. सदरच्या रस्त्यावर अपेक्षेपेक्षा कमी डांबर वापरल्यामुळे हाताने ही रस्ता उकरू लागला आहे. या रस्त्यावर बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे दहा ते बारा ठिकाणी छोटे छोटे खड्डे पडलेले दिसून आले. या संदर्भात संबंधित ठेकेदाराकडे विचारणे केली असता त्यांनी पाहणी करून दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. परंतु केवळ एक महिना होऊन तयार झालेला हा रस्ता पूर्ण काम झालेले असताना जर पहिल्याच पावसात अशा पद्धतीने उकरला जात असेल तर पूर्ण कार्यकाळात त्याची काय अवस्था होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सध्या गणेशोत्सव तर काही दिवसांनी नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहनांची रहदारी असते. रस्ता मोठा झाल्यामुळे मोठी वाहने ही या रस्त्यावरून धावणार आहेत. शेजारीच असलेल्या टेंभुर्णी अहमदनगर रस्त्याला हा जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याची केवळ डागडूजी न करता संपूर्ण रस्त्याची पुन्हा एकदा पाहणी करून याची चौकशी झाली पाहिजे व हलगर्जीपणा करणाऱ्या निरीक्षकावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भीमदलचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांनी केली.
प्रतिक्रिया
आम्ही काल परवा पाहणी केली त्यामध्येही काही ठिकाणी खड्डे असल्याचे दिसून आले होते. तर आता तुम्ही सांगत असलेल्या ठिकाणची पाहणी करून आम्ही चौकशी करू.
– सुनिता पाटील, अभियंता बांधकाम विभाग अकलुज.