E-Paperमाढाराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलेल्या ‘लाडक्या बहिणीला’ त्यांच्याच शिलेदाराचा विरोध ; अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

करमाळा समाचार 

करमाळा येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत करमाळा येथून बागल तर माढ्यातून मीनल साठे यांचा प्रचार करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ मीनल साठे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. पण त्यांच्याच शिलेदाराने याला सुरुंग लावत विरोधी गटात असलेल्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

माढा तालुक्याच्या राजकारणात शिंदे व सावंत यांचे वैरत्व सर्वश्रुत आहे. तरीही माढ्याच्या राजकारणात मोठी कलाटणी मिळाल्याचे दिसून आले. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी सावंत यांनी महायुतीचा भाग असतानाही मित्र पक्षाच्या उमेदवार मीनल साठे यांना पाठिंबा देण्याऐवजी ज्यांच्या सोबत आतापर्यंत जुळून घेत नव्हते अशा अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांना पाठिंबा देत साठे तसेच मुख्यमंत्री यांना जोरदार धक्का दिला आहे.

politics

मुख्यमंत्री करमाळ्यात आल्यानंतर मीनल साठे यांना पाठिंबा द्यावा, मताधिक्य द्यावे यासाठी भाषण करून गेले. यावेळी व्यासपीठावर महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे शिवाजी सावंत हेही उपस्थित होते. त्यांनी माढ्यात गेल्यानंतर लगेचच अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे नेमकं महायुतीत काय चाललंय यावरून कार्यकर्ते संभ्रमात आहेत. ज्या शिंदेंना अजितदादांचं तिकीट मान्य नव्हतं किंवा महायुतीची उमेदवारी नको होती त्यांना आता शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा चालत असल्याचेही दिसून येत आहे.

ज्या पद्धतीने भाजपाने करमाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बंडाला विरोध दर्शवत त्यांना पदावरून निष्कासित केले तसेच माढ्यातही शिंदे गट शिवसेना धाडस दाखवेल का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. पण या सर्व प्रकरणातून महायुती अंधारातून अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचे दिसत आहे. यामुळे महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तर महायुतीच्या उमेदवारांना यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
Audio Player
WhatsApp Group