दहिगाव उपसा सिंचन योजनेचे ओव्हर फ्लो आवर्तन सुरू
करमाळा समाचार
करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदायिनी ठरणार्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे ओव्हर फ्लो आवर्तन आजपासून दिनांक 2 सप्टेंबर पासून सुरू झाले असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. या योजनेच्या माध्यमातून करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील 24 गावे व त्या खालील 10,500 हेक्टर क्षेत्र हे ओलीताखाली येणार आहे. दिनांक 26 ऑगस्ट रोजी एक दिवसाचा पाहणी दौरा करून योजना कार्यान्वित करण्यासाठी अपूर्ण असलेल्या कामांची तात्काळ पूर्तता करून योजना लवकर कार्यान्वित करा अशा सूचना आ. शिंदे यांनी पाटबंधारे विभागाला केलेल्या होत्या.

त्यानुसार 2 सप्टेंबर रोजी सकाळी ही योजना सुरू झाली आहे.
या पाण्याच्या माध्यमातून पूर्व भागातील तलाव , बंधारे , नाले , ओढे इत्यादी भरून घेतले जाणार आहेत. उन्हाळी आवर्तनात ज्या गावांना पाणी मिळालेले नव्हते ,अशा देवळाली, गुळसडी ,पांडे आदी गावांना प्राधान्याने पाणी दिले जाईल अशी माहिती आमदार शिंदे यांनी दिली. या पाण्याचा योग्य उपयोग करून आपली पिके जोपासावीत तसेच भविष्यकाळात पाण्याचा तुटवडा जाणवू नये म्हणून या पाण्याने गावातील रचना भरून घ्याव्यात असे आवाहनही त्यांनी केले आहे.