केम मध्ये पाळीव डुकरांचा हैदोस ; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
करमाळा समाचार
केम तालुका करमाळा येथील शेतकऱ्यांना डुकरांच्या त्रासाने अतिशय हैराण केले असून संपूर्ण गावा सह परिसरात डुकरांनी थैमान घातले आहे. मका, ज्वारी सह केळीच्या पिकाच मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत ग्रामपंचायतीकडे तहसील कडे व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करूनही अद्यापही तोडगा निघत नाही. त्यामुळे आज पुन्हा गावकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. उपाय योजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तालुक्यातील केम भागात जवळपास दोनशे एकर क्षेत्र लागवडीखाली येत असून या भागात शेतकऱ्यांनी मका, ज्वारी व केळीचे पीक घेतले आहे. काहींचे पीक लागवडीनंतर काही दिवसातच तर बऱ्याच लोकांचे काढणीला आल्यानंतर सदरचे पीक या जनावरांकडून उच्छाद मांडून खराब केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर कोणीही लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर आता महिला व पुरुषांनी तहसीलदार यांच्याकडे दाद मागितले आहे. यावर तोडगा न निघाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

यावेळी राणूबाई तळेकर, शोभा तळेकर, स्वाती तळेकर, गुंफा तळेकर, रेणुका गुटाळ, विठाबाई तळेकर, विठ्ठल तळेकर गणेश तळेकर, हरी तळेकर, दादा तळेकर, मनोज तळेकर, लक्ष्मण तळेकर, उत्तरेश्वर टोणपे आदि उपस्थीत होते.