पोंधवडी शाखा कालवा- हुलगेवाडी चारीच्या कामाचा आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
करमाळा समाचार -संजय साखरे
2014 सालापासून करमाळा तालुक्याशी आपला संबंध आला असून या तालुक्याच्या प्रत्येक भागातील लोकांच्या अडचणी वेग वेगळ्या आहेत त्या सर्व अडचणी सोडविण्यावर आपण पूर्ण क्षमतेने काम करत असून त्याचे चांगले परिणाम आता दिसायला लागले आहेत .असे प्रतिपादन करमाळा माढा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे यांनी आज पोंधवडी शाखा कालवा हुलगेवाडी चारीच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप होते .कुकडीचे पाणी करमाळा तालुक्यात पूर्ण क्षमतेने आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू असून यासाठी आमदार रोहित दादा पवार यांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले .कोरोना च्या कालावधीतही जास्तीत जास्त निधी करमाळा तालुक्यासाठी आपण आणला असून आतापर्यंत कुकडी साठी 33 कोटी रुपयांचा निधी करमाळा तालुक्यासाठी आणला असून 2023 अखेर शंभर कोटी रुपयांचा निधी फक्त कुकडी च्या कामासाठी करमाळा तालुक्याला आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे असेही त्यांनी सांगितले.

कुकडी डाव्या कालव्याची लांबी 249 किलोमीटर असून त्यापैकी 223 ते 249 किलोमीटरचा भाग करमाळा तालुक्यात येतो .यामधील पोंधवडी शाखा कालव्याची एकूण लांबी 12 किलोमीटर असून यामुळे करमाळा तालुक्यातील 5531 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. गेल्या बारा वर्षांपासून हे काम प्रलंबित होते कारण पोंधवडी शाखा कालव्याची रेखा वन क्षेत्रातून जात होती. वन विभागाने हरकत घेतल्यामुळे पोंधवडी शाखा कालव्याची रेखा वनक्षेत्र वगळून बदलून देण्यात आली .यामधील बोगद्याचे काम पूर्ण झाले असून त्यापुढील खोदाईचे काम अपूर्ण होते .हे काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने नऊ कोटी 23 लाख रुपयांची निविदा इंगोले पाटील कंट्रक्शन पुणे यांना दिले आहे.
यामधून बोगद्याचे अस्तरीकरण, पुढील भागात खोदाई ,शाखा कालव्यावरील उर्वरित बांधकाम ,व हूलगेवाडी मायनर वरील उर्वरित मातीकाम व बांधकाम करणे यांचा समावेश आहे. हे काम चोवीस महिन्यांत पूर्ण करावयाचे असून हे काम पूर्ण झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील 11 गावांना सिंचनाचा लाभ होऊन या गावातील 5531 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
या कार्यक्रमासाठी कुकडी चे कार्यकारी अभियंता श्री जगताप साहेब यांच्यासह , इंजिनियर अवताडे साहेब ,मेहेर साहेब यांच्यासह बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे ,तानाजी बापू झोळ, चंद्रकांत सरडे ,राजेंद्रसिंह राजे भोसले, सुजित तात्या बागल ,दत्ता भाऊ जाधव, विलास दादा पाटील, विनोद जाधव, सतीश शेळके, सुनील सावंत ,संजय जाधव ,चंद्रहास निमगिरे, भरत अवताडे, राजुरी चे सरपंच अमोल दुरंदे, आर आर बापू साखरे, सुभाष अभंग, विहाळ चे सरपंच काशिनाथ भुजबळ ,पोंधवडी चे सरपंच रघुनाथ राऊत, वी ट चे सरपंच उदय ढेरे,सावडीचे सरपंच भाऊसाहेब शेळके छगन हुलगे,दासा हुलगे यांच्यासह विहाळ, कोर्टी, हुलगेवाडी, राजुरी, सावडी ,पोंधवडीचे लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी राजेंद्रसिंह राजे भोसले ,कार्यकारी अभियंता श्री जगताप साहेब, सुभाष आबा गुळवे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री निळकंठ अभंग साहेब यांनी केले तर आभार कॉन्ट्रॅक्टर इंगोले पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन नवले यांनी केले.