करमाळासोलापूर जिल्हा

ऊसतोड कामगार व मुकादमांनी बुडविले पैसे, वाहन मालक अडचणीत

प्रतिनिधी – संजय साखरे

 

ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा असलेल्या साखर व्यवसायाचा मुख्य आधार असलेल्या वाहन मालक आज प्रचंड अडचणीत आलेला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेक वाहन मालकांनी ऊसतोड करणाऱ्या टोळ्या व मुकदमा ना पैसे देऊनही ते न आल्याने वाहन मालक पुरते हवालदिल झाले आहेत. परिणामी पैसे तर गेलेच पण या वर्षीचा धंदाच नाही अशा दुहेरी संकटात वाहनमालक सापडले आहेत.

तालुक्याच्या पश्चिम भागात व संपूर्ण उजनी बॅकवॉटर भागात अनेक सुशिक्षित तरुणांनी शेतीला जोड धंदा म्हणून ऊस तोड टोळ्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी धुळे-नंदुरबार ,पुसद, जालना , सटाणा, हिंगोली या भागातील ऊसतोड मुकादम शी करार केले आहेत. त्यांना तीन ते चार लाख रुपये तर काहीजणांनी जास्त कामगारांची टोळी यावी म्हणून सात ते आठ लाख रुपयांपर्यंत उचली दिल्या आहेत, पण टोळी आणण्यास गेल्यानंतर काहींचे मुकादम फरारी झाले आहेत तर तर काही कामगारांनी दुसऱ्या मुकादमाच्या उचल घेऊन ते दुसऱ्या कारखाना कडे किंवा परराज्यातील कारखान्याकडे गेले आहेत.

यामध्ये वाहन मालक मुकादमाला बांधील असतो .मुकदमा चा करार करून त्याची नोटरी केली जाते. काही कामगार एकापेक्षा जास्त मुकादमाकडून पैसे घेतात व एकाकडे ऊस तोडण्यात जातात. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांचे पैसे मिळणे अवघड झाले आहे. काही मुकादमांनी तर पैसे फेडीसाठी ट्रॅक्टर मालकांच्या घरी सालगडी म्हणून काम धरले आहे. परंतु त्यांची संख्या नगण्य आहे.
एका वाहन मालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की ,मी चार चाकी गाडी भाड्याने घेऊन एक महिनाभर मुकदमा कडे राहिलो. पण त्याचे एकही कोयते भेटले नाही. त्याला मी दोन टोळ्याची एकूण अकरा लाख रुपये उचल दिली आहे. आपली टोळी आली नाही म्हणून त्यामुळे भाव-भावकीत व गावात आपली किंमत कमी होईल म्हणून काही वाहन मालक गावातच फिरत नाहीत हे वास्तव चित्र आहे.

यामध्ये ज्या कारखान्याकडे ट्रॅक्टर मालकाने करार केलेला आहे तो कारखाना हा वाहन मालकाला पैसे देतो. त्यामुळे कारखाना मुकदम आणि कामगारांच्या बाबतीत कसल्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही .जर संबंधित वाहन मालकाने वाहतूक केली नाही तर कारखाना हा वाहन मालकाकडून पैसे वसूल करतो.

चैन बनवून अधिकृत नोंदणी-
सध्या सर्वच क्षेत्रात आधार लिंक व बायोमेट्रिक पद्धत आलेले आहे . त्यामुळे ट्रॅक्टर मालकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कारखाना- ट्रॅक्टर मालक- मुकादम -व ऊस तोड कामगार अशी एक चैन बनवून नोंदणी केल्यास त्याच्या माध्यमातून एका ट्रॅक्टर मालकाकडे अथवा कारखान्याकडे गुंतलेला कामगार कोणाचीही फसवणूक न करता एकाच ठिकाणी बांधील राहील ,त्यामुळे ट्रॅक्टर मालकांचे होणारे नुकसान टळेल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE