करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा विधानसभेची संभाव्य लढत जवळपास निश्चित ; प्रमुख पक्षासह अपक्षही असतील मैदानात

करमाळा समाचार 

महाराष्ट्रातील जागावाटप जवळपास पूर्ण झाले असले तरी अद्याप करमाळ्यात मात्र कशा पद्धतीची लढत होईल हे अजून गुलदस्त्यातच आहे. पण सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून करमाळा तालुक्यातील संभाव्य लढती या उघडपणे दिसून येऊ लागल्या आहेत. फक्त आता घोषणा बाकी असल्याचे दिसत आहे. याबाबत संबंधित पक्षाने किंवा गटाने अधिकृत घोषणा केलेली नसली तरी होऊ घातलेल्या निवडणुकीत अशीच काहीशी परिस्थिती असु शकते.

करमाळा विधानसभा मतदारसंघ कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेला आहे. सुरुवातीच्या काळात करमाळा तालुक्याचे राजकारण गटातटावर अवलंबून असल्याने पक्षाच्या झेंड्याकडे एवढे लक्ष दिलं जात नव्हतं. गटाचे नेते सोयीनुसार आपला पक्ष ठरवत असत व त्या पक्षातून निवडून येण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. पण आता करमाळ्याच्या नेत्यांना पक्षातील गॉडफादर असल्याने प्रत्येक नेता कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे झुकलेला दिसून आलेला आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी तालुक्यात प्रमुख दोन्ही गट मैदानात असतील त्यांच्या समोर अपक्ष आव्हान असेल असे दिसून येत आहे.

politics

लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना हमीभाव, जरांगे फॅक्टर व मोहिते पाटील यांचा प्रभाव यामुळे लोकसभा मतदारसंघात करमाळा व इतर तालुक्यात महायुतीची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झालेली दिसून आली. विशेष म्हणजे करमाळा तालुक्यात बागल व शिंदे दोन्ही मोठे गट एकत्र आले होते तरी चाळीस हजार मतांपेक्षा जास्त मताधिक्याने मोहिते यांना फायदा झालेला दिसून आलेला आहे. त्यामुळे जनतेचा कल नेत्यांनी ओळखला व निवडणुकीत उतरताना सावध भूमिका घेऊ लागले. यामुळेच तालुक्यात महायुतीचे तिकीट मागताना चढाओढ दिसून आली नाही.

लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्याच वेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी केलेल्या प्रवेशाचं व त्यांनी राष्ट्रवादीवर दाखवलेल्या विश्वासाचं फळ त्यांना यंदा मिळणार असल्याचे दिसत आहे. तर मागील वेळी अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले संजयमामा शिंदे हे पुन्हा एकदा अपक्षच लढण्याच्या भूमिकेत आहेत. त्यांना महायुतीकडून तिकीट किंवा पाठिंबा दोन्हीच्या ऑफर असताना ते त्या मुडमध्ये नसल्याचे दिसून येते. तर अडचणीत असलेले कारखाने बाहेर काढण्यासाठी बीजेपी प्रवेश केलेले बागल कुटुंबीय सध्या पक्षाच्या आदेशाची वाट पाहत आहेत. महायुती मधून त्यांना संधी मिळू शकते.

जरांगे यांनी सगळ्याच पैलवानांना तेल लावून मैदानात उतरवण्याचे ठरवले असल्याने प्रा. रामदास झोळ, शंभुराजे जगताप, सुनील सावंत, उदयसिंह देशमुख यासारखे कार्यकर्ते जरांगे यांच्या पुढील आदेशाची वाट पाहतील. जरांगे यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला नाहीतरी प्रा. झोळ हे मैदानातून बाहेर पडण्यास इच्छुक नाहीत ते मैदानात कायम राहतील. तर तालुक्यातील सर्वात जुना गट असलेल्या जगताप गटाचे नेते जयवंतराव जगताप यांची भुमिका महत्वाची मानली जाते त्यांनी अद्याप आपले पत्ते ओपन केले नाहीत.

त्यामुळे आता करमाळा तालुक्यातील चित्र जवळपास स्पष्ट झाला असून महाविकास आघाडीकडुन नारायण पाटील, महायुतीकडुन दिग्विजय बागल, अपक्ष संजयमामा शिंदे, जरांगे आदेश नसल्यास शेतकरी संघटना किंवा अपक्ष प्रा. झोळ अशा लढती बघायला मिळण्याची शक्यता आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE