भाडेतत्वावर जाण्यास रोखला पण अडचणी जैसे थे ; विरोध करणारे गेले कुठे ?
करमाळा समाचार
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत सापडल्यानंतर भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु तालुक्यातील काही पुढाऱ्यांनी समोर येत भाडेतत्त्वावर देण्यास विरोध केला व सदरचा कारखाना सहकारी राहावा यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर मात्र यावर प्रशासक आले व हा कारखाना प्रशासकीय मंडळाच्या ताब्यात गेला. पण भाडेतत्त्वावर कारखाना गेल्यानंतर कारखान्याच्या पगारी मिळण्यापासून कारखान्यात चांगल्या बाबी दिसून आल्या असत्या. पण आता मात्र कारखाना पुन्हा एकदा डबघाईला जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे यावर कोणीही बोलताना दिसत नाही.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता होती. कारखान्यात थकीत ऊस बिले व पगारी यामुळे वारंवार या ठिकाणी आंदोलने होत होती. त्या पार्श्वभूमीवर बागलांनी सदरचा कारखाना हा भाडेतत्त्वावर देण्यासाठी ठराव पास करून घेतला होता. सदरचा ठराव पास झाल्यानंतर आ. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोने टेंडर भरले व कारखाना २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्याचे ठरले. नंतर मात्र आदिनाथ बचाव समिती समोर आली व त्यांनी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास विरोध केला. त्यानंतर बागल गटाने ही घुमजाव करत कारखाना सहकारी राहावा यासाठी प्रयत्न करताना दिसून आले. कारखाना स्वत: कडे राहील अशी त्यांची इच्छा असली तरी निवडणुकीचा खर्च न भरल्याचे कारण दाखवत यावर प्रशासक लादण्यात आले व तेव्हापासून आजतागायत यावर प्रशासक मंडळ काम पाहत आहे. परंतु पुन्हा एकदा प्रशासक मंडळाकडे निवडणूक खर्च जमा करण्यासंदर्भात कळवले असतानाही अद्याप निवडणूक खर्च जमा केलेला दिसून येत नाही.

भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असताना या भागात कामगारांसह सभासदांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचे दिसून येत होते. मागील देणे येणार नसताना पुढील देणे तरी कमीत कमी वेळेवर येतील व कारखाना चालू होईल अशी आशा कामगारांसह सभासदांना होती. त्यामुळे या परिसरात उत्साही वातावरण तयार झाले होते. परंतु खाजगीकरण व सहकारी या मुद्द्यावर कारखाना पुन्हा ताटकळत राहिला. मुळातच आ. रोहित पवार यांना कारखाना चालण्याचा चांगला अनुभव असल्याने आदिनाथही चांगल्या पद्धतीने चालू होईल अशी आशा प्रत्येकाला होती. परंतु ती आशा भाडेकरार रद्द करून संपुष्टात आली.
कारखान्याचे गाळप कमी …
बागलांना बाजूला करून सदरचा कारखाना प्रशासक मंडळाच्या ताब्यात देण्यात आला. या वर्षी कारखाना रोखीने बिले अदा करत आहे. तरीही कारखान्याकडे ऊस आणण्यासाठी शेतकरी उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. इतर कारखान्यांपेक्षा कमी भाव व मागील अडचणींचा अनुभव याशिवाय ऊस वाहतूक करणारी अपुरी यंत्रणा यामुळे या कारखान्याकडे सध्या शेतकरी फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कारखाना किती गाळप करेल हा मोठा प्रश्न आहे. कारखान्याची कार्यकारी संचालक श्री रमेश बागनवर यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत दहा दिवसात साडेतीन हजार मॅट्रिक टन गाळप झाले आहे. यामुळे येणाऱ्या काळात कारखान्याची काय स्थिती राहील हा मोठा प्रश्न आहे.
बागलांकडुन जाताच विरोधक शांत .. मुळ प्रश्नाकडे दुर्लक्ष..
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता असताना बऱ्याचदा या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी आंदोलने झाली. एवढेच काय तर सध्या मकाईची मागील देणे दिले नसल्याने वेगवेगळी आंदोलने होताना दिसत आहेत. परंतु आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील थकीत पगारी व सध्याच्या परिस्थितीवर बोलण्यासाठी कोणताच गट समोर येत नाही किंवा कारखाना चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी इतर गटाकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य होताना दिसत नाही. त्यामुळे विरोधकांनी कारखाना चालवण्यापेक्षा बागलांना विरोध करण्यासाठी आंदोलने केली का ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.