जेलमध्ये झालेली मैत्री भोवली ; एकाला सहा लाखांना लुटले
करमाळा समाचार
जेल मध्ये ओळख वाढवत मैत्री करुन खुनातील आरोपी असलेल्या कैद्याने भेटायला बोलवत लुटल्याचा प्रकार करमाळा तालुक्यातील कात्रज येथे दि ७ रोजी सायंकाळी साडे सहा वाजता कृष्णाई इग्लिश स्कुल जवळ घडला आहे. यावेळी सातवेकर दांपत्याकडुन तब्बल ६ लाख १४ हजारांचा मुद्देमाल लुटुन नेला आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश नबीलाल काळे (वय २७) रा.भकासवस्ती मदनवाडी इंदापूर जि.पुणे, योगेशची बहीण सुवर्णा व दोन अनोळखी इसम असे गुन्हा दाखल झालेल्यां संशयीतांची नावे आहेत. तर याप्रकरणी कपिल प्रकाश सातवेकर (वय २७) रा. अनंतरोटो, कागल ता. कागल जि. कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, कपील सातवेकर हा विनयभंगाच्या आरोपात तर योगेश काळे हा खुन व दरोड्याच्या आरोपात कळंबा जेल कोल्हापूर येथे अटकेत होते. त्यावेळी योगेशची आई व बहीण योगेश ला भेटण्यासाठी आल्यावर कपील यांच्याशीही बोलत होत्या त्यामुळे ओळख वाढली. जेल मधुन जामीनावर बाहेर आल्यावरही फोन वर बोलणे व्हायचे ते भेटण्यासाठी बोलवत असत.

दि ७ रोजी सर्व कुटुंबासोबत कपील सातवेकर हे महाबळेश्वर येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत रोख पाच लाख रुपये होते. यावेळी काळे यांचा फोन आला त्यावेळी कपील यांच्याकडे रोख रक्कम असल्याचे बोलण्यातुन लक्षात आले होते. त्यानंतर हट्ट करुन काळे यांनी कपील व कुटुंबीयांना भिगवण येथे बोलवले तिथुन शेती पाहण्याच्या बहाण्याने कात्रज ता. करमाळा येथील कृष्णाई शाळेजवळ घेऊन गेले व सुरीचा धाक दाखवत मारहाण करुन जवळील सोन्याची चैन, अंगठी, मंगळसुत्र व रोख रक्कम असे एकुण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल लुटुन पोबारा केला. याप्रकरणी करमाळा पोलिसात तक्रार केल्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.