महिला अधिकाऱ्यावर हल्ल्याचा निषेध ; करमाळा नगरपरिषद कामकाज आज कडकडीत बंद
करमाळा समाचार
ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्ता वर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ करमाळा नगर परिषदेचे काम बंद आंदोलन
काल दिनांक 30/08/2021 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती. कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू कडून त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली, तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच न्हवे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्चीकरण होते. त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे.

त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून आज दिनांक 31/08/2021 रोजी ” करमाळा नगरपरिषदेचे” संपूर्ण कामकाज कडकडीत रित्या बंद करण्यात आले आहे. याआंदोलनामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गाने सहभागी होऊन आपला निषेध नोंदविला
सकाळी ठिक अकरा वाजता नपा कार्यालयासमोर सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्रित रित्या येऊन या घटनेचा जाहीर निषेध केला.
तसेच दोषीवर योग्य ती कडक कायदेशीर कार्यवाही होणेबाबतचे निवेदन मा . जिल्हाधिकारी सोलापूर व मा. तहसीलदार करमाळा यांना देण्यात आले. यामध्ये प्रमुख्याने मुख्याधिकारी श्रीमती वीणा पवार व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.