मांगी मध्यम प्रकल्पातून ओव्हर फ्लो चे आवर्तन सुरू
प्रतिनिधी – संजय साखरे
कुकडी लाभक्षेत्रातील सर्व धरणे ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग मांगी तलावाला सलग 30 दिवसाहून अधिक काळ येऊन मिळाल्यामुळे मांगी तलाव 30 सप्टेंबर अखेर ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे या प्रकल्पातून वाहून जाणारे पाणी मांगी तलावाच्या लाभक्षेत्रातील गावाला देण्याच्या दृष्टीने नियोजन केले असून 4 ऑक्टोबर पासून 300 क्युसेक विसर्ग द्वारे मांगी तलावाच्या उजव्या कालव्याला पाणी सुरू झाले असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सन 2020 मध्ये मांगी प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यानंतर आपण लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन दिले होते .त्यानंतर हा तलाव 2 वर्ष भरलाच नाही. यावर्षी कुकडी प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने मांगी तलावाला पाणी मिळाल्यामुळे मांगी प्रकल्प ओव्हर फ्लो झाला.त्यामुळे मांगी प्रकल्पाच्या उजवा आणि डावा या दोन्ही कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील गावांना पाणी देण्याचे आपले नियोजन आहे. सध्या यांत्रिकी विभागाच्या 2 जेसीबी मशीन द्वारे उजव्या कालव्याची दुरुस्ती तसेच झाडे झुडपे काढणे आदी कामे गेल्या 4 दिवसात केले असून उजव्या कालव्याला 300 क्युसेकने पाणी सुरू केलेले आहे.
या पाण्याचा फायदा पोथरे, मांगी, निलज, खांबेवाडी, करंजे या गावांना होणार आहे. डावा कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर डाव्या कालव्यालाही पाणी सुरू केले जाणार आहे .या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील गावांची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार असून त्याचा फायदा बारमाही पिकांना होणार आहे.
