करमाळासोलापूर जिल्हा

पोलीस अधीक्षक यांचा वाळू माफियांना दणका ; सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी

प्रतिनिधी – सोलापूर 


मौजे आष्टे ता. मोहोळ येथील यारी मशिनद्वारे अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यात आली आहे . यावेळी 01 ट्रॅक्टर, यारी मशिनसह 05 हॅड्रोलिक टेम्पोट्रक वाहनासह एकूण 35 लाख 03 हजार 200 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मा.पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा आढावा घेवून जिल्हयातील अवैध धंदयाचा आढावा घेवून वाळू माफियांवर कडक कारवाई करणेबाबत एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हयात चोरून चालणारे अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करणेकरीता पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील विशेष पथकाची नेमणूक केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर एलसीबी कडील पथकाने मागील काही दिवसापूर्वी मौजे कुमठे ता. अक्कलकोट येथील बोटी ( जलयान ) वर अवैध वाळू उपषावर कारवाई करत एकूण 3 लाख 37 हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई केली होती.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मौजे आष्टे ता. मोहोळ जि. सोलापूर येथील सीना नदीच्या पात्रातून काही इसम यारी मशिनच्या सहाय्याने शासनाची परवानगी व राॅयल्टी नसताना चोरून वाळू काढून त्याचा साठा करून विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी विशेष पथकातील सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी पथकासह मौजे आष्टे ता. मोहोळ जि. सोलापूर येथे जावून बातमीप्रमाणे खात्री केली असता, सदर ठिकाणी ट्रॅक्टरला लोखंडी यारी मशिन जोडून सिना नदीच्या पात्रातून वाळू उपसा करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून वाळू उपसा पाॅंईंटची खात्री झाल्यानंतर पाॅंईंट पासून काही अंतरावर असलेल्या पिकामध्ये मध्यरात्री पोहचून पिकात पथक दबा धरून बसले असता पहाटेच्या सुमारास काही वाहने वाळू भरण्यासाठी पाॅईंटवर आले व वाळू भरून निघण्याच्या तयारीत असताना 12 इसमांना गराडा घालून पकडले व काही इसम पळून गेले.

वाळू पाॅईंटच्या ठिकाणाहून 1 ट्रॅक्टर, यारी मशीन संच, 05 हॅड्रोलिक टेम्पोट्रक असे एकूण 35 लाख 03 हजार 200 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 12 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर बाबत मोहोळ पोलीस ठाणे गुरंन 00/2021 भादविकाक 379, 34 पर्यावरण कायदा 1986 चे कलम 9 व 15 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE