उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना डावलुन वशीलेबाजीने दहावी पास उमेदवाराची भरती – उच्चशिक्षीत उमेदवाराची तक्रार
करमाळा समाचार – विशाल घोलप
तालुक्यातील १९ गावातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया मध्ये उच्चशिक्षित उमेदवाराला डावलून दहावी पास असणाऱ्या उमेदवाराला पोलीस पाटील प्रक्रियेत पास करण्यात आल्यामुळे सदर प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाच्या मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. याबाबतची निवेदन राणी मधुकर शिंदे रा. शेलगाव यांनी दिले आहे. तरी प्रक्रिया थांबवून नियुक्तीपत्र देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.

नुकत्याच पोलीस पाटील निवड प्रक्रियेत करमाळा तालुक्यातील १९ गावात पोलीस पाटील नेमण्यात आले आहेत. सुरुवातीपासूनच या प्रक्रियेवर तक्रारींचा पाऊस पडत होता. त्यामुळे सदरची प्रक्रिया पुढेही ढकलण्यात आली होती. परंतु अचानक सदर प्रक्रियेमध्ये तोंडी परीक्षा घेऊन निवडी करण्यात आल्या. त्यातही मोठा गोंधळ असल्याच्या तक्रारी निवेदनातून करण्यात आले आहेत.

सदरच्या प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा झाल्यानंतर परीक्षेतील मार्क कळवणे आवश्यक होते. तर विद्यार्थ्यांना कार्बन कॉपी देणे गरजेचे होते तसे करण्यात आले नाही. त्यानंतर काही तक्रारी झाल्या त्यामुळे मुलाखत पुढे ढकलण्यात आली होती. ११ मार्च रोजी तोंडी परीक्षा घेण्यात आली. सदर तोंडी परीक्षेत सुद्धा दहावी पास असणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेत जास्त गुण देऊन तोंडी परीक्षेत कमी गुण मिळाले असताना देखील त्यांची पोलीस पाटील या पदावर आर्थिक व्यवहारातून नियुक्ती केल्याचे तक्रार केली आहे.
यामध्ये ग्रॅज्युएट तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डीएड असणाऱ्या गुणवत्ताधारक उमेदवारांना लेखी परीक्षेत कमी गुण दाखवून फक्त दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवाराची नेमणूक पोलीस पाटील पदावर केली गेली आहे असेही तक्रारीत म्हटले आहे. सदर प्रक्रियेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत नियुक्त पत्र देऊ नयेत अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. सदरचे पत्र हे मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पुणे विभागीय आयुक्त, उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी तसेच तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.