अतिवृष्टी बाधीतांसाठी मागीतले 20 आले 14 ; वाटपाला झाली सुरुवात
करमाळा समाचार
जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप 13 नोव्हेंबर पासून सुरू झाले आहे. करमाळा तालुक्यातील 36737 शेतकरी खातेदारांनी करिता 20 कोटी 21 लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती.

जिल्हा प्रशासनाकडे शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीपैकी 14 कोटी 41 लाख रुपये इतकी रक्कम करमाळा तालुक्यासाठी प्राप्त झाली आहे. त्यापैकी 9 कोटी 80 लाख रुपये बँकेकडे शेती पीकांचे नुकसानीसाठी जमा केले असून संबंधित शेतकरी यांचे बँक खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. प्राप्त अनुदानामध्ये शेती पीकांचे नुकसान भरपाई देणेस प्राधान्य देणेत आले आहे. घर पडझड,मयत जनावरे,शेत जमीन नुकसान याकरीता प्राप्त 4 कोटी 61 लाख रूपये वाटपाचे काम सुरू असून दोन दिवसात संबंधीतांचे खातेवर जमा होतील.

जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ते 33 टक्के नुकसान झालेले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिकांसाठी रक्कम रुपये 10000 प्रती हेक्टर तर बहुवार्षिक पिकांसाठी रक्कम रुपये 25000 हजार प्रति हेक्टर याप्रमाणे सदरची रक्कम अदा करण्यात येणार आहे.