दुध डेअरी चालक व अन्नभेसळ अधिकाऱ्यांची ईडी चौकशीसह इतर मागण्यांसाठी रास्तारोको ; शेतकरी आक्रमक
करमाळा समाचार
दुधाला प्रति लिटर ४० रुपये हमीभाव, पशुखाद्याच्या किमती ५० टक्के कमी, पशु औषध जीएसटीतून मुक्त, ईडी चौकशी यासारख्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर कुंभेज फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सदरचे आंदोलन दि २२ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास केले जाणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे जनावरांचा चारा देखील विकत घेऊन घालावा लागत आहे अशा अतिशय हालाखीच्या परिस्थितीत दूध व्यवसाय करताना अडचणी निर्माण होत आहे. त्यामध्ये दुधाचे दर प्रति लिटर ३६ रुपये वरून २६ रुपये इतका कंरे झाला आहे. तीन महिन्यापूर्वी महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधाला ३४ रुपये हमीभाव देणे तसेच पशुखाद्य किमती कमी करण्याच्या संदर्भात अध्यादेश जाहीर केला होता. परंतु सध्या दुध दर २६ पर्यंत खाली पडले आहेत. तसेच पशुखाद्य कंपन्यांनी खाद्याचे भाव कमी करण्याऐवजी प्रतिबॅगला ५० ते १०० रुपये वाढवले आहेत. त्यामुळे दूध व्यवसाय प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे.

त्यामुळे दुधाला ४० रुपये प्रति लिटर हमीभाव मिळावा, पशुखाद्याच्या किमती ५० टक्के कमी केल्या पाहिजेत, पशु औषध जीएसटीतून मुक्त करण्यात यावीत, महाराष्ट्रात गेल्या पंधरा वर्षात अन्नभेसळ प्रतिबंधक पथकाने कारवाई केल्या व किती भेसळखोर आरोपींना शिक्षा किंवा दंड ठोठावला याची श्वेतपत्रिका काढावी, सर्व खाजगी व सहकारी फ्लॅन्ट चालक यांचे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून दरमहा ऑडिट घ्यावे व कोणाचे संकलन किती आहे? व दूध पिशवी विक्री किती आहे, बाय प्रॉडक्ट किती आहे याची दर महा माहिती सार्वजनिक जाहीर करावी, महाराष्ट्रातील सर्व खाजगी व सहकारी प्लान्ट चालक व अन्नभेसळ प्रतिबंधक पथकातील अधिकारी यांची ईडी चौकशी करण्यात यावी, ज्या खाजगी व सहकारी दूध संघ चालकांनी गेल्या तीन महिन्यापासून शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी भाव दिला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, पशुखाद्य किंवा पशु औषध यांची गुणवत्तेनुसार किमान व कमाल आधारभूत किंमत ठरवण्यात यावी, टोन्ड दुधावर बंदी घालण्यात यावी, शासनाने ठरवून दिलेल्या हमीभाव आणि आत्ताचा दर यामधला फरक शेतकऱ्यांना मिळावा, फ्याट फरक पूर्वीप्रमाणे ०.२० पैसे कमी जास्त करावा, दूध पावडरला अनुदान द्यावे अशा मागण्या केल्या आहेत.
सदरच्या निवेदनावर आशिष गायकवाड, किरण गिड्डे, रणजीत लबडे, सचिन गावडे, विवेक बोराडे, संदीप गायकवाड. राजाराम बिनवडे. विशाल साळुंखे, मनोहर पवार, अभिमान वीर, देविदास बर्डे, बापू गुंड, दत्तू कानगुडे, पोपट बोराडे, प्रकाश कानगुडे, ज्योतीराम गुंड आदींच्या सह्या आहेत यावेळी डेअरी चालकांसह शेतकरी उपस्थीत होते.