धरणग्रस्तांच्या पर्यायी जमीनींसाठी संजयमामांची जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठक ; सतीश नीळ यांनी मांडल्या धरणग्रस्तांच्या समस्या
प्रतिनिधी – करमाळा समाचार
सिना कोळगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी मिळाव्यात म्हणून करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कडे बैठक घेऊन पूर्व भागातील आवाटी, निमगाव (ह.)कोळगाव, हिवरे, मिरगव्हाण, भालेवाडी येथील जवळपास ७३२ शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे.

या वेळी सिना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ यांनी धरणग्रस्त शेतकऱ्यां च्या विविध अडचणी मांडल्या. तसेच अगोदर पुनर्वसन मगच धरण हा कायदा असताना हि आत्ता पर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही हि बाब अत्यंत गंभीर आहे व तत्कालीन अधिकारी यांच्या तांत्रिक चुकी मुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित राहिला आहे. त्यांना पर्यायी जमिनी वाटप करण्यात याव्यात व याकामी भरावी लागणारी ६५% रक्कम भरण्याची फेर नोटीस द्याव्यात अशी मागणी केली.

त्यावरून श्री. मिलिंद शंभरकर साहेब जिल्हाधिकारी यांनी याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी मोहिनी चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उध्दव माळी, स्विय सहाय्यक संजय अंबोले, सिना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ, निमगाव (ह)चे उपसरपंच विठ्ठल जगदाळे, कोळगाव चे उत्तम शिंदे, कालिदास नीळ, ज्ञानेश्वर बिचीतकर, संतोष शिंदे आदी जण उपस्थित होते.