रावगाव व परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई – बुधवंत
करमाळा समाचार
यावर्षी करमाळा तालुक्यात कमी पाऊस झाल्याने टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले असतानाच राजकीय मंडळी या निवडणुकीत मशगुल आहेत ग्रामीण भागात शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. तेव्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे मत रावगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या प्रीती बुधवंत यांनी मांडले.

रावगाव व परिसरात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे रावगाव मध्ये सध्या टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे परंतु या टँकरच्या खेपा वाढवण्याची गरज आहे तसेच वाडीवस्त्यावर टॅंकरने पाणीपुरवठा होत नाही मोठमोठ्या वस्त्यावर शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी फायबर टाक्या देऊन या टाक्यात टँकरने पाणी सोडल्यास येथील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो यामध्ये राऊत- भुजबळ -पाटील वस्ती, केकान- बुधवंत वस्ती, धनगर वस्ती, सोलंकर वस्ती, बाबर वस्ती, या वस्त्यावर प्रामुख्याने पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.
सध्या मजुरांच्या हाताला काम भेटत नाही. शासनाने रोजगार हमी योजनेतून कष्टकऱ्यांसाठी, मुजरांसाठी शेतीतील कामे ताली टाकणे, पाणी चर खोदणे, बांध-बंधिस्ती तयार करणे ,छोटे छोटे नाले खोदणे, शेततळी खोदणेअसे कामे रोजगार हमीतून चालू करण्यास प्राधान्य द्यावे. त्यामुळे कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या हाताला काम तर मिळेलच शिवाय शेतीतील कामे शासनाच्या वतिने झाली. तर उत्पन्न वाढीसाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल, तसेच मांगी तलावात कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मिटण्यास मदत होईल. तेव्हा कुकडी कॅनाॅलद्वारे मांगी तलावात पाणी सोडण्याचे नियोजन वरिष्ठ पातळीवरून व्हावे असेही रावगाव ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रिति भाऊसाहेब बुधवंत यांनी म्हटले आहे.
