करमाळा , माढ्यात आवर्जुन जेष्ठ नेते पवारांची सभा ; विरोधकांचा भ्रमाचा भोपळा फोडणार
करमाळा समाचार
करमाळा माढा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार नारायण पाटील यांच्या सन्मानार्थ आज जेष्ठ नेते शरद पवार यांची सभा करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालय मैदानात सकाळी १० होणार आहे. विशेष म्हणजे पवार साहेबांनी सोलापूर जिल्ह्यात केवळ दोनच ठिकाणी सभा दिलेली आहे त्यात करमाळा व माढा या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे आम्ही पवारांचेच म्हणून विरोधात लढणाऱ्यांनी भ्रमाचा भोपळा तयार केला आहे तो आज फुणार हे नक्की झाले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यामुळे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर आता विधानसभाच्या निवडणुकांमध्ये माढा व करमाळा हे दोन मतदारसंघ सध्या पुन्हा एकदा जेष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यामुळे चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात केवळ दोनच ठिकाणी श्री. शरद पवार यांनी सभा घेण्याचे ठरवल्याने या दोन मतदारसंघावरील विशेष प्रेम दिसून येत आहे.
सध्या माढा व करमाळ्यात तुतारीचे वारे जोरदार वाहत असल्याने व महायुतीची झालेली पीछेहाट पाहता बलाढ्य असलेल्या विद्यमान आमदारांनी पक्षातून उमेदवारी न घेता अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे माढ्याचे बबनराव शिंदे यांनी वारंवार ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मागण्याचा प्रयत्नही केला. पण अडचणीच्या काळात पवारांची साथ सोडून अजित दादांसोबत जाण्याचा निर्णय हा ज्येष्ठ नेते पवार यांना अजूनही रुचलेला दिसून येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही सभा न घेता केवळ करमाळा व माढा या ठिकाणी सभा घेतल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात छुप्या पद्धतीने अजित दादाचेच कार्यकर्ते उभा असल्याचे या ठिकाणी चित्र आहे. त्यामुळे पवार यांनी अधिक ताकद लावल्याची चर्चा आहे. दोन्ही पवारांना नेते मानणाऱ्या त्याच उमेदवाराच्या विरोधात पवार यांनी सभा घेऊन पवार नेमके कोणाच्या बाजूने उभा आहेत हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता बाजूने किंवा विरोधात एवढाच फरक बाकी राहिला होता तो या ठिकाणी स्पष्ट झाला आहे.